एका अमेरिकन महिलेच्या बलात्कारप्रकरणी ‘पिपली लाईव्ह’ चित्रपटाचा सह-दिग्दर्शक महमूद फारूकीला दिल्ली उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले. घटना आणि तक्रारीच्या सत्यतेवर शंका उपस्थित करत न्यायालयाने फारूकीला दोषमुक्त केले.

न्यूयॉर्कच्या कोलंबिया विश्वविद्यालयात संशोधन करणाऱ्या एका ३५ वर्षीय अमेरिकन महिलेने दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात फारूकीविरोधात मार्च २०१५ मध्ये बलात्काराची लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फारूकीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. ऑगस्ट २०१६ मध्ये फारूकीला याप्रकरणी दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. याविरोधात फारूकीने दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

आपल्या संशोधनाच्या कामासाठी फारूकीची मदत घेण्यासाठी गेले असता दिल्लीच्या सुखदेव विहार येथे बलात्कार केल्याचा आरोप अमेरिकन महिलेने केला होता. घटनेनंतर फारूकीने ई-मेलद्वारे माफी मागितल्याचेही तिने कोर्टात सांगितले. मात्र, फारूकीने हे सर्व आरोप फेटाळले. ‘जानेवारी २०१५ पासून तक्रारकर्ता आणि फारूकी रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यादरम्यान संमतीने घडलेल्या गोष्टींना बलात्कार म्हणता येत नाही,’ असे म्हणत फारूकीच्या वकिलांनी कोर्टात तक्रारकर्ता आणि फारूकीदरम्यान पाठवण्यात आलेले मेसेजेस कोर्टात सादर केले. त्याचप्रमाणे पुरावे आणि तक्रारकर्त्याने नोंदवलेला जबाब परस्परविरोधी असल्याचेही वकिलाने म्हटले.

या निकालानंतर ‘कधी ना कधी सत्य सर्वांसमोर येते,’ अशी प्रतिक्रिया फारूकीची पत्नी अनुषा रिझवीने प्रसारमाध्यमांना दिली. अनुषाने २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पिपली लाईव्ह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर या चित्रपटाचे फारुकीने सह दिग्दर्शन व लेखन केले होते.