सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करताना रोखले म्हणून दिल्लीत २१ वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.

दिल्लीतील हर्ष विहार येथे राहणारा संदीप हा मजुरीचे काम करतो. ‘हिंदूस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी संध्याकाळी संदीप घराबाहेर बसला होता. यादरम्यान तिथून चार तरुण जात होते. यातील एका तरुणाने संदीपच्या घराजवळच लघुशंका केली. यामुळे संदीपने घराबाहेर वाळत घातलेले कपडे खराब झाले. संदीपने त्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि यावरुन वाद सुरु झाला. यादरम्यान बाचाबाचीही झाली. शेवटी चारही तरुण घटनास्थळावरुन पळून गेले.

प्रकरण मिटले असे वाटत असतानाच गुरुवारी संध्याकाळी चार पैकी दोन तरुणांनी संदीपला गाठले. त्यांनी संदीपला मारहाण करत निर्जनस्थळी नेले आणि तिथे दगडांनी ठेचून त्याची हत्या केली. गुरुवारी रात्री उशीरा संदीपचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता बुधवारी संदीपचा चार तरुणांशी वाद झाल्याचे समोर आले. या आधारे पोलिसांनी चार पैकी तीन तरुणांना अटक केली. रझा, सेबू आणि मुकीम अशी या अटक केलेल्या तरुणांची नावे असून मुख्य आरोपी चांद हा फरार आहे. चारही आरोपी हे मजूर म्हणून काम करत होते.