दिल्लीतील महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने एक्झिट पोलचे बोल खरे ठरवत आपसह काँग्रेसला धक्का दिला आहे. बुधवारी निकाल हाती लागत असताना भाजपची सरशी पाहता काँग्रेसच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्लीतील पराभव हा आक्रमकपणाच्या अभावामुळे झाल्याचे म्हटले. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करण्यामध्ये काँग्रेस कमी पडल्याचे त्या म्हणाल्या. दिल्लीत पराभव झाला असला तरी पक्ष पुन्हा खंबीरपणे उभा राहिल. काँग्रेस देशाचे मूळ आहे. त्यामुळे एका पराभवाने अस्तित्त्व संपणार नसल्याचेही त्या म्हणाल्या.

दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यामध्ये मुख्य लढत असताना शीला दीक्षित प्रचारापासून लांब राहिल्या होत्या. प्रचारामध्ये त्या कुठेच दिसल्या नाहीत. याबद्दल शीला दीक्षित म्हणाल्या की, मी प्रचारात सहभाग घ्यावा, असे मला कोणीच सांगितले नव्हते. त्यामुळे मी प्रचारामध्ये सहभागी झाले नाही. महापालिका निवडणुकीसाठी ज्याप्रमाणे प्रचार व्हायला हवा होता, त्याप्रमाणे प्रचार केला गेला नाही. शिला दीक्षित यांनी अप्रत्यक्षपणे दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने कोणतीही तयारी केली नसल्याचे सांगत पक्षाला घरचा आहेरच दिला आहे.

यापूर्वी शिला दीक्षित यांनी विधानसभेच्या निवडणुकीमुळे काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण असल्याचे म्हटले होते. त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीची धूरा सांभाळणाऱ्या दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांच्यावरही निशाणा साधला होता. दिल्लीची जनता अजय माकन यांना नव्हे, तर काँग्रेसला मत देणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शीला दीक्षित यांनी केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला होता. दिल्लीतील चिकनगुनिया, डेंग्यू ही महापालिकेसह केजरीवाल सरकारची जबाबदारी आहे. केजरीवाल काही काम करत नाहीत. ते फक्त बोलतात. केजरीवाल यांच्या सरकारच्या काळातच दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्युचा प्रभाव वाढला आहे. लोकसभेपासून ते महापालिकेपर्यंत मोदी लाटेत काँग्रेसचे अच्छे दिन गायब झाले आहेत. गल्ली ते दिल्लीत वाहणारे मोदी वारे काँग्रेसच्या अस्तित्व निकामी करताना दिसत आहे. त्यामुळे शीला दीक्षित यांच्या म्हणण्याप्रमाणे पुढचा प्रवास तरी काँग्रेस प्रभावीपणे करणार का? हे येणारा काळच ठरवेल.