दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील पीडित तरुणी मृत्यूशी झुंज देत होती, तोपर्यंत तिच्या समर्थनार्थ रस्त्यांवर उतरलेल्या दिल्लीकरांचा संताप गेल्या शनिवारी ओसंडून वाहात होता. मात्र, पहाटे तिच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त ऐकून हवालदिल झालेले दिल्लीकर पुन्हा रस्त्यांवर उतरले ते त्या मृत तरुणीला शांततामय पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी.
गेल्या शनिवारी दिल्ली पोलिसांचा लाठीमार, अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांना सामोरे जाणारे उग्र आणि हिंसक निदर्शक शनिवारी जंतरमंतर आणि मुनिरका या भागांमध्ये अत्यंत शांततामय पद्धतीने मृत तरुणीविषयी शोकसंवेदना व्यक्त करीत होते. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही जनतेच्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनक्षोभामुळे तो फसला.
पीडित तरुणीच्या निधनाचे वृत्त येताच केंद्र सरकार आणि या घटनेचा तीव्र निषेध नोंदविणारे निदर्शक दोन्हीही घटक खडबडून जागे झाले. गेल्या शनिवार-रविवारी रायसीना हिल्स, विजय चौक, राजपथ आणि इंडिया गेट परिसरात झालेल्या िहसक आंदोलनातून धडा घेत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्ते सकाळपासूनच बंद करीत जमावबंदीचे कलम १४४ लागू केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात दिल्ली पोलीस आणि निमलष्करी पोलीस दलाच्या तुकडय़ा तैनात केल्या आणि राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे निवासस्थान, मुख्यमंत्री दीक्षित आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानापाशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. या भागातील मेट्रो रेल्वेची प्रगती मैदान, मंडी हाऊस, बाराखंबा रोड, राजीव चौक, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन, रेसकोर्स रोड, जोरबाग आणि खान मार्केट ही दहा स्थानके तत्परतेने बंद केली. बुलेटप्रुफ जॅकेट घातलेले पोलीस पाण्याचे फवारे व अश्रुधुराचे गोळे सोडण्याच्या सज्जतेने तैनात झाले होते. इंडिया गेट परिसरात निदर्शकांना शांततामय निदर्शने करू देण्यात यावी, असे आवाहन शीला दीक्षित यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केले.
दुसरीकडे शोकसंतप्त नागरिकही रस्त्यांवर उतरले होते. त्यांनी इंडिया गेट परिसर बंद करण्याच्या सरकारच्या कृतीचा तसेच या भागातील सुरक्षा बंदोबस्ताचा तीव्र निषेधही केला. पण, मृत तरुणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी रस्त्यावर उतरलेला जमाव हिंसक मनस्थितीत नव्हता. ज्या भागात त्या तरुणीवर नृशंस बलात्कार झाला त्या मुनिरका बसस्थानकाच्या दिशेने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी एक शांतता मोर्चा काढला आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
इंडिया गेट परिसरात शांततामय आंदोलनाला मज्जाव करण्यात आल्यामुळे सकाळपासून जंतरमंतरवर शोकसंतप्तांची गर्दी जमत होती. शांततेने निदर्शने करण्याचा संकल्प घेऊनच कोणतीही घोषणाबाजी न करता जंतरमंतरवर लोक पोहोचले होते. मीडियालाही भावना न भडकू देण्याचे आवाहन करण्यात येत होते. दिल्लीबाहेरून आलेले नागरिकही त्यात सामील झाले होते.
जंतरमंतरवर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, कुमार विश्वास आदी तोंडाला पट्टय़ा लावून उपस्थित होते. तरुण, तरुणी, महिला, मध्यमवयीन आणि बुजुर्ग मोठय़ा संख्येने गोळा झाले होते. विविध गट शांतपणे रस्त्यावर बसले होते.    

शीला दीक्षित हाय, हाय !
औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री शीला दीक्षित दुपारी जंतरमंतरवर पोहोचल्या. त्यांनी हातात मेणबत्ती घेऊन मूक आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याकडे लक्ष जाताच जमावाने ‘शीला दीक्षित हाय हाय, दिल्ली सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत त्यांना घेराव घातला आणि धक्काबुक्कीही केली. दीक्षित आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना जमावाच्या घेरावातून बाहेर पडणे अवघड झाले होते. तरीही शीला दीक्षित तिथे दहा मिनिटे तेथे थांबल्या. त्यांनी मेणबत्ती पेटवून मृत तरुणीला श्रद्धांजली वाहिली. शीला दीक्षित या घटनेचे राजकारण करीत असल्याचा आरोप संतप्त आंदोलक करीत होते.