गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या रोहित वेमुल्ला आत्महत्याप्रकरणावरून सरकार पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. रोहित वेमुल्लाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ ३० जानेवारीला नवी दिल्लीच्या झंडेवाला परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना करण्यात आलेली अमानुष मारहाण सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून यामध्ये गणवेशधारी पोलीसांबरोबर काही साध्या वेषातील व्यक्तीही आंदोलनकर्त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. या साध्या वेषातील व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या व्यक्ती स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. याशिवाय, व्हिडिओत पोलीस आंदोलक विद्यार्थ्यांवर केवळ लाठीमार करतानाच नव्हे तर महिला आंदोलकांचे केस धरून त्यांना ओढत आणि जमिनीवर ढकलून देत असल्याचेही दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही मारहाण केल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आंदोलकांनी बॅरिकेडसचे पहिले सुरक्षाकवच तोडल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. मात्र, पोलीस दलाकडून या सगळ्याचा इन्कार करण्यात आला असून अशाप्रकारची कोणतीही मारहाण झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. आंदोलक संघ कार्यालयाबाहेरील बॅरिकेडस तोडून पोलीस ठाण्यात शिरण्याच्या तयारीत होते. यावेळी जमाव हाताबाहेर गेल्याने आम्हाला लाठीमार करावा लागल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.