माजी महिला सहकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले ‘टेरी’चे कार्यकारी उपाध्यक्ष आर. के. पचौरी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांना मंगळवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
जवळपास १४०० हून अधिक पानांचे आरोपपत्र असून ते महानगर दंडाधिकारी शिवानी चौहान यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावर २३ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
पोलिसांनी एकूण २३ साक्षीदारांची जबानी घेतली असून ते ‘टेरी’चे आजीमाजी कर्मचारी आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयात पोलिसांनी अलीकडेच दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे की, पीडित महिलेसमोर न्यायालयाबाहेर तडजोड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र न्यायालयाने पचौरी यांना मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी मागणी पीडित महिलेने केली होती.
गेल्या वर्षी २१ मार्च रोजी पचौरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी पचौरी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.