पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी घेऊन धरण्यावर बसलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सायंकाळी या आंदोलनाची समाप्ती केली. मात्र, मंगळवारी दिवसभर केजरीवाल यांच्या हट्टवादी भूमिकेपुढे केंद्र सरकारपासून पोलिसांपर्यंत सारेच हतबल झाले. केजरीवाल यांच्या आंदोलनाने दिल्लीला वेठीस धरल्यानंतर या आंदोलनाचा फटका प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ालाही बसण्याची चिन्हे दिसताच केंद्र सरकारने आपली भूमिका मवाळ केली.
   प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षिततेचं कारण पुढे करीत केजरीवाल यांनी ‘जंतरमंतर’ येथे आंदोलन करावे, असा सल्ला दिल्ली पोलिसांनी दिला होता. मात्र यावर संतप्त झालेल्या  केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘दिल्लीचा मुख्यमंत्री मी आहे, तर मी कुठे आंदोलन करावे हे मी ठरवणार. मी आंदोलन कुठे करावे हे सांगणारे ते कोण? सुशीलकुमार शिंदे दिल्लीचे मुख्यमंत्री नाहीत, त्यामुळे आंदोलन कुठे करावे हे शिंदे यांनी मला सांगू नये,’ अशी भूमिका केजरीवाल यांनी घेतली. रेल भवन येथे आंदोलन करणाऱ्या ‘आम आदमी पक्षा’चे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत १२ आंदोलक, तर आंदोलकांच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. रेल भवन येथील रस्त्यावर आपच्या टोप्या परिधान करून आलेल्या २०० ते ३०० जणांच्या जमावाने बॅरिकेड तोडले आंदोलनस्थळी  जबरदस्तीने जाण्याचा प्रयत्न केला.  पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करण्यास सुरुवात केली.