दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी तीन व्यक्तींना १०२० जिवंत काडतुसांसह अटक केली. मेट्रो रेल्वेच्या वेलकम स्थानकाजवळून त्यांना पकडण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी दिली. दिल्लीत होणाऱ्या आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्याला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.  मोहम्मद इम्रान, शरीक आणि फहीम अशी अटक केलेल्यांची नावे असून ते अनुक्रमे सीतापूर, मीरत आणि उत्तराखंडचे रहिवासी आहेत. प्राथमिक तपासात दहशतवादाची शक्यता समोर आली नसली तरी या प्रकरणाची कसून चौकशी होत आहे.

सैन्यभरती शिबिरात चेंगराचेंगरी
पेरांबूर (तामिळनाडू) : येथील जिल्हा क्रीडा मैदानावर झालेल्या सैन्यभरती शिबिरात चेंगराचेंगरी होऊन सैन्यात नोकरीच्या इच्छेने आलेले तीन उमेदवार जखमी झाले. भूदलात सैनिकांच्या भरतीसाठी झालेल्या सैन्यभरती शिबिरात शारीरिक क्षमता चाचणीसाठी हजारो तरुण या ठिकाणी गोळा झाले होते. चाचणीसाठी आपला नंबर आधी लागावा म्हणून काही तरुण गर्दीमधून धावू लागले, तेव्हा चेंगराचेंगरी होऊन तीनजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

इंडोनेशियात सहाजणांना मृत्युदंड
जकार्ता : ब्राझील व नेदरलँडच्या प्रत्येकी एका नागरिकासह अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या सहाजणांना इंडोनेशियात ‘फायरिंग स्क्वाड’मार्फत देहान्ताची शिक्षा देण्यात आली. ब्राझील व नेदरलँड यांनी याबाबत संताप व्यक्त केला असून, शिक्षेच्या निषेधार्थ इंडोनेशियातील आपल्या राजदूतांना परत बोलावले आहे. या दोघांशिवाय इतर आरोपी व्हिएतनाम, मलावी, नायजेरिया आणि इंडोनेशिया या देशांचे होते. जोको विडोडो यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर देहान्ताच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आलेले हे सहाजण सर्वप्रथम होते. इंडोनेशियात अमली पदार्थविरोधी कायदे कठोर आहेत. ऑक्टोबर महिन्यात पदभार स्वीकारलेल्या विडोडो यांची प्रतिमा ‘सुधारक’ अशी असली, तरी या गुन्ह्य़ासाठी देहान्ताच्या शिक्षेचे ठाम समर्थन करून त्यांनी मानवाधिकार कार्यकर्त्यांची निराशा केली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष दिलमा रूसेफ आणि नेदरलँडचे परराष्ट्रमंत्री बर्ट कोएंडर्स यांनी देहान्त शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय समुदाय आवाज उठवत असून, यामुळे आपल्या परस्पर संबंधांवर गंभीर परिणाम होतो, असे रूसेफ यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे; तर हे सहा मृत्यू ‘अतिशय दु:खदायक’ असून नेदरलँडचा मृत्युदंडाला नेहमीच विरोध आहे, असे डच परराष्ट्रमंत्री म्हणाले.

काश्मिरात थंडीचा कडाका कायम
श्रीनगर : काश्मिरात स्वच्छ आकाश व सूर्यप्रकाशामुळे थंडी कमी झाली असून हवामान कोरडे झाले आहे. किमान तपमान गोठण बिंदूच्या आसपास आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत हिमवृष्टी व पावसाची शक्यता आहे. काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये कमाल तपमान १२.७ अंश होते. रात्रीचे कपमान ३.७ अंश सेल्सियस होते. काझीगुंड येथे उणे ४.२ अंश तपमान होते. दक्षिण काश्मीरमध्ये पहलगाम येथे उणे ६.४ अंश तपमान नोंदले गेले. पहलगाम येथे सर्वात कमी तपमान नोंदले गेले.