दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) माजी कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांना नोटीस पाठवून सरकारी बंगला त्वरीत रिकामा करण्यास सांगितले आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा आता कॅबिनेट मंत्री नाहीत. त्यामुळे ते सरकारी निवासस्थानासाठी पात्र नाहीत. पाणी नियोजनतील त्रुटींच्या आरोपामुळे मिश्रा यांना ६ मे रोजी मंत्रिपदावरून हटवण्यात आले होते.

नियमानुसार कॅबिनेट मंत्रिपदावरून हटवण्यात आल्यानंतर १५ दिवसांच्या आत सरकारी बंगला सोडणे आवश्यक आहे. आता ते या बंगल्यात राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला बंगला लवकरात लवकर रिकामा करण्यास सांगितल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन विभागाला एक पत्र लिहून त्वरीत हा बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले होते. मंत्रिपदावरून हटवल्यानंतर कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह आम आदम पक्षाच्या नेत्यांविरोधात आरोपांची मालिकाच सुरू केली होती.