पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरही नरेंद्र मोदी यांच्यावरील गोध्रा दंगलीचा डाग अद्याप पुसला गेलेला नाही. दिल्लीस्थित जामा मशिदीच्या नायब इमाम नियुक्तीच्या ‘दस्तारबंदी’ सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करणार नसल्याचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी स्पष्ट केले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या धार्मिक सोहळ्यास सय्यद बुखारी यांनी देशविदेशाच्या राजकीय प्रमुखांसह पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण धाडले आहे. मात्र, ‘मोदी भारतीय मुस्लिमांना आपलेसे वाटत नाहीत’ अशी जहरी टीका करून बुखारी यांनी त्यांना निमंत्रण धाडलेले नाही.
‘गोध्रा दंगलीत मोदींची महत्त्वाची भूमिका होती. मुस्लीम प्रतीकांचादेखील मोदी वापर करीत नाहीत. जोपर्यंत मोदी मुस्लिमांच्या हितासाठी पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत ते आम्हाला आपलेसे वाटणार नाहीत,’ अशी आक्रमक टीका सय्यद बुखारी यांनी केली आहे. अर्थात २६ मे रोजी झालेल्या भाजपप्रणीत रालोआ सरकारच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यास देशातील सर्व प्रमुख हिंदू धर्मगुरूंना निमंत्रण धाडण्यात आले होते. ज्यात बाबा रामदेव, श्रीश्री रविशंकर, स्वामीनारायण पंथ, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, गायत्री परिवाराच्या प्रमुखांचा समावेश होतो. या सोहळ्यास सय्यद अहमद बुखारी यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नव्हते.
काय आहे ‘दस्तारबंदी’?
जामा मशिदीची स्थापना १६६५ साली झाली. २४ जुलै १६६५ साली पहिल्यांदा जामा मशिदीत नमाज अदा करण्यात आली. याच दिवशी गफूर शाह बुखारी यांना पोशाख व दोशाला देऊन त्यांची शाही इमामपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. दस्तारबंदी कार्यक्रमात नायब इमामाची नियुक्ती करण्यात येते. येत्या २२ नोव्हेंबरला सय्यद शाबान यांना नायब इमाम घोषित करण्यात येईल. सय्यद शाबान हे समाजकार्य विषयात पदवीचे शिक्षण घेत आहेत. आठवडाभर हा कार्यक्रम चालेल.
सोहळ्याचे निमंत्रित
सय्यद इमाम बुखारी यांचे चिरंजीव सय्यद शाबान यांना २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘दस्तारबंदी’ सोहळ्यात नायब इमाम घोषित करण्यात येईल. कार्यक्रमानिमित्त रात्री भोजनसमारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळय़ासाठी भारतातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायम सिंह यादव यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, डॉ. हर्षवर्धन या भाजप नेत्यांनाही या कार्यक्रमाला बोलावण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनाही निमंत्रण आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना या कार्यक्रमास बोलावण्यात आलेले नाही. याबद्दल या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या काही गटांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी यांना निमंत्रण देणे गरजेचे होते, असे मत एका नेत्याने  पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.