दिल्ली विद्यापीठ आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ हॅक झाल्याचा प्रकार घडला आहे. ही संकेतस्थळे पाकिस्तानी गटांकडून हॅक करण्यात आली आहेत. दोन्ही संकेतस्थळांवर सारखाच मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. काश्मीरचा पाकिस्तान होईल, असा संदेश हॅकर्सनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.

‘तुमचे हिरो (सैनिक) काश्मीरमध्ये काय करतात, हे तुम्हाला माहित आहे का? ते काश्मीरमध्ये अनेक निष्पाप लोकांना मारत आहेत, याची कल्पना तुम्हाला आहे का?, त्यांनी किती मुलींवर बलात्कार केला आहे, हे तुम्हाला माहित आहे का?, जर तुमच्या भावाला, बहिणीला, आईला किंवा वडिलांना मारण्यात आले, तर तुम्हाला कसे वाटेल?’ असा मजकूर पाकिस्तानी हॅकर्सकडून दिल्ली आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

amu-1

‘काश्मीर येत्या काळात पाकिस्तान होईल,’ असेदेखील पाकिस्तानी हॅकर्सनी म्हटले आहे. या मजकुरासोबतच पाकिस्तानी हॅकर्सनी एक छायाचित्रदेखील प्रसिद्ध केले आहे. यामध्ये भारतीय जवान एका व्यक्तीला मारताना दिसत आहेत. पाकिस्तानी हॅकर्सकडून एक व्हिडिओदेखील शेअर करण्यात आला आहे. पाकिस्तानी हॅकर्सकडून दहापेक्षा जास्त सरकारी संकेतस्थळे हॅक करण्यात आली आहेत. यामध्ये नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरिजचादेखील समावेश आहे.

csir