योगगुरू बाबा रामदेव यांच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कार्यक्रमास विरोध झाल्यानंतर दिल्ली विद्यापीठातदेखील काँग्रेस व डाव्यांचे वर्चस्व असलेल्या विद्यार्थी संघटनांनी रामजन्मभूमीचा कार्यक्रम उधळून लावण्याची तयारी सुरू केली आहे. शनिवारी ‘राम जन्मभूमी’ प्रकरणावर दिल्ली विद्यापीठात अभ्यास परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी देशभरातून इतिहासाचे अभ्यासक, विद्यार्थी, संशोधकांना निमंत्रण देण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या कॉन्फरन्स सेंटरमध्ये हा कार्यक्रम होईल. विद्यापीठाच्या कला विभागानेच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आयोजनात पुढाकार असलेले विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित असल्याचा आरोप करीत एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात शुक्रवारी निषेध मोर्चा काढला. त्यांनी कुलगुरूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

यासंदर्भात काँग्रेसप्रणीत एनएसयूआयचे नीरज मिश्रा म्हणाले की, विद्यापीठ एक धर्मनिरपेक्ष संस्था असते. विद्यापीठाच्या आवारात येणारा प्रत्येक जण केवळ विद्यार्थी असतो, परंतु आता रामजन्मभूमीसारख्या वादग्रस्त मुद्दय़ावर विद्यापीठाच्या आवारात कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक भावना वाढीस लागेल. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक कोणतीही मदत होणार नाही. एनएसयूआय विरोधात अभाविपनेदेखील हा कार्यक्रम विनाअडथळा पार पाडण्याचा चंग बांधला आहे. यापूर्वीदेखील दिल्ली व जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एनएसयूआय, अभाविप, एसएफआय या विरोधी विचारधारेच्या संघटनांमध्ये सतत संघर्ष होत असे. परंतु असहिष्णुतेच्या मुद्दय़ावरून गोमांस खाणे, विजयादशमीला महिषासुर दिवस संबोधण्याच्या काही विद्यार्थी संघटनांच्या कार्यक्रमांमुळे वर्षभरापासून हा संघर्ष तीव्र झाला आहे. अलीकडेच बाबा रामदेव यांचा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यास तीव्र विरोध झाल्याने हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. आता दिल्ली विद्यापीठात रामजन्मभूमी कार्यक्रमावरून पुन्हा संघर्ष उफाळून आला आहे.