नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा बोल्ड नव्हे तर मूर्खपणाचा आहे, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते गुरूवारी संसदेच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून काळा दिवस साजरा करण्यात येत असून संसद परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच नेत्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नरेंद्र मोदी यांनी महिनाभरापूर्वी मनाला वाटले म्हणून आर्थिक प्रयोग करून पाहिला. या निर्णयामुळे देशातील गरीब, शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणारी जनता उद्ध्वस्त झाली आहे. आम्हाला संसदेत या सगळ्यावर चर्चा व्हावी असे वाटते. यावर मतदान झाले पाहिजे. मात्र, सरकार त्यासाठी तयार नाही. अनेकजण मोदी यांचा निर्णय बोल्ड असल्याचे म्हणतात. मात्र, कोणताही विचार न करता घेण्यात आलेला हा निर्णय बोल्ड नव्हे तर मूर्खपणाचा असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषा दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे. परदेशातून काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास दहशतवाद, बनावट पैसा अशा मुद्द्यांपासून कॅशलेस अर्थव्यवस्थेपर्यंत येऊन पोहचला आहे. पंतप्रधान मोदी चर्चेपासून पळत आहेत. ते संसदेत चर्चेसाठी आले तर आम्ही त्यांना पळून देणार नाही. तसेच लोकसभेत मला बोलून दिले तर ‘पेटीएम’चे ‘पे टू मोदी’ कसे झाले, हे मी सगळ्यांना सांगेन. देशातील लोक त्रास भोगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हसतात. कॅशलेस अर्थव्यवस्थेमागे मोजक्या लोकांना फायदा मिळवून देण्याचा उद्देश आहे. हे सगळे देशाचे नुकसान करणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.