माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांची टीका

नोटाबंदीच्या निर्णयावरून विरोधकांचा टीकेचा भडिमार सुरू असतानाच माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. ”नोटाबंदीचा निर्णय ही गेल्या ७० वर्षांच्या आर्थिक धोरणातील सर्वात मोठी घोडचूक आहे”, अशी टीका शौरी यांनी केली. सल्लामसलत न करताच निर्णय घेणे हे एककल्लीपणाचे लक्षण असून, भविष्यात अशा निर्णयांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शौरी म्हणाले.  ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’मध्ये ‘विकास आणि राजकारण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

”नोटाबंदीचा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचे दिसत नाही. कोणाच्या तरी डोक्यात हा नोटाबंदीचा विचार आला आणि त्यास कोणीही विरोध केला नाही”, असे सांगत शौरी यांनी हा निर्णय एकाधिकारशाहीने घेतलेला असल्याच्या आरोपाला बळकटी दिली. या प्रकरणात रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांचे वर्तन अर्थमंत्रालयातील अवर सचिवासारखे होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारला वारंवार निर्णयात बदल करावे लागले. त्यातूनच हे सरकार उघडे पडले, असे शौरी यांनी सांगितले.

नोटाबंदीचा चांगला परिणाम झाला असून, जनतेने ठिकठिकाणी मतदानाद्वारे त्यावर मोहोर उमटवली आहे, अशा शब्दांत या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या भाजप मंत्र्यांनाही शौरी यांनी लक्ष्य केले. अर्थव्यवस्था कशी चालायला हवी, हे सर्वसामान्यांना कळत नाही. शिवाय निवडणुकीत मतदार इतरही मुद्दे विचारात घेत असल्याने निवडणुकीत विजय हे नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन होऊ शकत नाही, असे शौरी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान कार्यालयाच्या कामकाजाचे आजच्याइतके केंद्रीकरण कधीच नव्हते. विद्यमान पंतप्रधान कार्यालय सर्वाधिक कमकुवत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.