नोटाबंदीच्या निर्णयानंतर आत्तापर्यंत तब्बल २ हजार कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम उघड झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे. यामधील ४०० हून अधिक प्रकरणांमध्ये उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम बाळगल्याचे समोर आले आहे. याप्रकरणांची आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी नोटाबंदीनंतर जाहीर झालेल्या बेहिशेबी रकमेची माहिती दिली. यानुसार आत्तापर्यंत करदात्यांनी २ हजार कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम उघड झाल्याचा दावा अर्थमंत्रालयाने केला आहे. बेंगळुरुमधून सर्वाधिक जुन्या नोटा जप्त करण्यात आल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आत्तापर्यंत १३० कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. गंभीर स्वरुपातील प्रकरण अधिक चौकशीसाठी सक्तवसुली महासंचालनालय आणि सीबीआयकडे सोपवण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत अशा प्रकारची ३० प्रकरण सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयकडे सोपवल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

बेहिशेबी रकमेत जुन्या नोटांसोबतच नवीन नोटांचाही समावेश आहे. आयकरच्या मुंबई विभागाने ८० लाख रुपयांच्या नवीन नोटा जप्त केल्याचे अर्थमंत्रालयाने सांगितले. लुधियानामधून १,४०० अमेरिकी डॉलर आणि ७२ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये एका गाडीतून प्रवास करणा-या पाच जणांकडे ९५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुण्यामधून २० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. यातील १० लाख रुपये एका सहकारी बँकेच्या लॉकरमध्ये आढळले आहेत. तर भोपाळमध्ये एका ज्वेलर्सवर कारवाई करण्यात आली आहे. हा ज्वेलर्स जुन्या तारखेच्या बिलाने ग्राहकांना सोने विकत होता. दिल्लीतील अॅक्सिस बँकेच्या अधिका-यांवर कारवाई केल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय सरकारी बँकेंच्या काही शाखांमधील ऑडीटही सुरु असल्याचे अर्थखात्याने सांगितले.