नोटाबंदीवरुन उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे. नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना उत्तरप्रदेश सरकारने आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत दिली जाईल असे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जाहीर केले.

उत्तरप्रदेशमधील अलीगढमध्ये रझिया या ४५ वर्षीय महिलेने २० नोव्हेंबररोजी स्वत:ला जाळून घेतले होते. मोलमजुरी करणा-या रझिया यांना पाचशेच्या सहा जुन्या नोटा बदलून हव्या होत्या. त्यांनी पाच दिवस विविध बँकांमध्ये फे-याही मारल्या. पण त्यांना नोटा बदलून मिळत नव्हत्या. शेवटी २० नोव्हेंबररोजी त्यांनी स्वतःला जाळून घेतले. ४ डिसेंबरला रझिया यांचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला. रझिया यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात त्यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले याचा खुलासा केला होता. पैसे नसल्याने तीन दिवस मुलांना जेवण देता येत नव्हते आणि म्हणून हे टोकाचे पाऊल उचलले असे रझिया यांनी सांगितले होते.

रझिया यांच्या मृत्यूप्रकरणावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रझिया यांच्या कुटुंबीयांना उत्तरप्रदेश सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल असे त्यांनी जाहीर केले. याशिवाय नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांच्या  कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले. यामध्ये एटीएम किंवा बँकेच्या रांगेत उभे असताना जीव गमावलेल्यांचाही समावेश असेल असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून सर्व छाननी झाल्यावरच मदत दिली जाईल असे त्यांनी नमूद केले.

उत्तरप्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.  केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय या निवडणुका बघूनच घेतला असा दावा विरोधक करत आहे. तर नोटाबंदीवरुन केंद्र सरकारवर पलटवार करण्यासाठी अखिलेश यांनी मदत जाहीर केल्याची चर्चा उत्तरप्रदेशमध्ये रंगली आहे.