शनिवार, रविवार आणि सोमवारी ईद-ए-मिलादची सुट्टी यामुळे तीन दिवस बॅंका बंद राहणार असल्यामुळे लोकांना आजच एटीएममधून पैसे काढण्यास सुरूवात केली आहे. सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे बॅंका बंद राहतील तेव्हा एटीएममध्ये रोख टाकण्यास बॅंकेचे कर्मचारी येणार नाही असा विचार करुन लोकांनी आज एटीएमबाहेर रांगा लावल्या. उद्या पैसे संपल्यास अडचण निर्माण होईल असे लोकांना वाटल्यामुळे एटीएमबाहेरील गर्दीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

नोटाबंदीची घोषणा होऊन एक महिना उलटून गेला तरी परिस्थिती मूळपदावर आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पन्नास दिवस कळ सोसा असे म्हटल्यानंतर अनेकांना त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. परंतु आता लोकांचे धैर्य संपत आल्याचे दिसत आहे.

एटीएमबाहेर गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून सुरुवातीला मोदींच्या निर्णयाला पाठिंबा देणारे लोक आता तक्रारींचा सूर आवळू लागले आहे. सामान्य माणसाला २००० रुपये काढण्यासाठी किंवा १०,००० रुपये काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे तर भ्रष्ट लोकांकडे शेकडो कोटी रुपये सापडत आहे. माटुंग्यामध्ये एका व्यक्तीकडे ८५ लाख रुपये सापडले त्यामध्ये २००० च्या नोटांचा प्रामुख्याने समावेश होता. या उदाहरणाकडे बोट दाखवत लोक तक्रार करीत आहे. जेव्हा नव्या नोटा अजून बॅंकेत आल्या नाहीत तर या लोकांकडे कुठून येत आहेत असे ते म्हणाले.

हा सुट्टीचा पहिलाच दिवस आहेत आणि आत्ताच एटीएमच्या बाहेर नो कॅशचे बोर्ड दिसू लागले आहे. तेव्हा पुढील दोन दिवस बिना नगदी पैशांचे कसे काढायचे हा प्रश्न लोकांना पडला आहे. मुंबईतील काही एटीएम केवळ दोन हजारांच्याच नोटा देत होते. ते एटीएमदेखील बंद पडल्याचे निदर्शनास येत आहे. काही बॅंका या हिशेबासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत परंतु त्यांचा ग्राहकांना कुठलाच फायदा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पहिल्याच दिवशी हे हाल होत आहे तर पुढचे दोन दिवस कसे राहतील याची कल्पनाच न केलेली बरे असे लोक म्हणत आहेत.

मोरादाबाद येथे बॅंकेची केली नासधूस

बॅंक उघडून काही वेळ जात नाही तोच बॅंकांनी नो कॅशचा बोर्ड लावल्यामुळे नागरिकांनी तिथे गोंधळ केला. लोकांनी बॅंकेची नासधूस करण्याचा देखील प्रयत्न केला. या गदारोळामुळे बॅंक कर्मचाऱ्यांनी पोलिसांची मदत घेतली. बॅंक केवळ काही मोजक्याच ग्राहकांना नगदी देत आहे असा आरोप काही जणांनी केला.