रिझर्व्ह बँकेकडून या आठवड्यात सर्वसामान्य लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. बँक खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेकडून वाढवली जाण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. या आठवड्यात बँक खात्यातून काढता येणाऱ्या रोख रकमेच्या मर्यादेची समीक्षा करण्यात येणार असल्याची माहिती टाईम्स नाऊने दिली आहे. यानुसार चालू खात्यातून रोख रक्कम काढण्याची मर्यादा ५० हजारांवर नेली जाऊ शकते. तर बचत खात्यातून रोख रक्कम काढण्याची मर्यादा ३० ते ३५ हजार रुपये केली जाऊ शकते.

याआधी १ जानेवारी २०१७ रोजी एटीएममधून दिवसाकाठी अडीच हजार रुपये काढण्याची मर्यादा साडे चार हजार रुपये करण्यात आली होती. मात्र दर आठवड्याला एटीएमधून २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली होती. मात्र लवकरच रिझर्व्ह बँकेकडून एटीएममधून पैसे काढले जाण्याची मर्यादादेखील वाढवली जाऊ शकते.

सध्याच्या घडीला कोणतीही व्यक्ती बचत खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढू शकत नाही. मात्र अनेक ठिकाणी बँकांना दर आठवड्याला ग्राहकांना २४ हजार रुपयांची रोख रक्कमदेखील उपलब्ध करुन देणे शक्य झालेले नाही. त्यामुळे लोकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. विशेषत: लग्नघरांना सरकारच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बसला. यानंतर लग्नाची पत्रिका दाखवून वधू-वराला किंवा त्यांच्या आई-वडिलांना दोन लाख रुपये बँक खात्यातून काढता येतील, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेने केली होती.

नोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे देशातील चलन संकटाची तीव्रता कमी झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील मुद्रणालयांमध्ये वेगाने नोटांची छपाई करण्यात आली आहे. त्यामुळे चलनकल्लोळ कमी झाला आहे. त्यामुळे आता बँक खात्यातून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली जाईल, अशी अपेक्षा देशवासीयांना आहे. मात्र केंद्र सरकार रोख रकमेचा वापर कमी करुन डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच महिन्याकाठी एका एटीएम कार्डमधून करता येणारे मोफत व्यवहारांची संख्या तीनपर्यंत आणण्याचा सरकारचा विचार आहे.