उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पसरलेले दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत अपघातात १६ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर धुक्यामुळे रेल्वे आणि विमानांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे.
बाराबंकी येथे झालेल्या अपघातांमध्ये पाच जण ठार झाले, तर फतेहपूर येथे तीन जण ठार झाले. तर बस्तीमध्ये थंडीने तीन जणांचा आणि कुशीनगर आणि सिद्धार्थनगर येथे प्रत्येकी एकाचा बळी घेतला आहे. दाट धुक्याचा फटका रेल्वे व विमान वेळापत्रकालाही बसला असून रेल्वे स्थानके आणि विमानतळांवर प्रवाशांना तिष्ठत राहावे लागत आहे. मुझफ्फरनगरमध्ये सर्वात कमी म्हणजे ३.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी बुधवारी दाट धुके पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.