दाभोळ प्रकल्पाला ऊर्जानिर्मितीसाठी नैसर्गिक वायू पुरवावा, याकरिता ऊर्जा खात्याने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला पुन्हा साकडे घातले आहे.
हा प्रकल्प निदान काही प्रमाणात सुरू व्हावा, यासाठी आम्ही पेट्रोलियम मंत्रालयाला विनंती केली आहे, असे ऊर्जा खात्याचे अतिरिक्त सचिव अशोक लव्हासा यांनी वार्ताहरांना सांगितले.
दाभोळ प्रकल्पाच्या वित्त पुरवठादारांपैकी, आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी ऊर्जा मंत्रालयाला या प्रकल्पासंबंधात नुकतेच पत्र लिहिले आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी त्याचा आढावा घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. जर प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यात सरकारला अपयश आले तर अशा प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे बँकेला यापुढे जड जाईल, असेही कोचर यांनी या पत्रात नमूद केले होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘केजी-डी ६’ क्षेत्रातून होणारा वायुपुरवठा थांबविण्यात आल्यानंतर दाभोळ प्रकल्पाच्या प्रवर्तक ‘रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर प्रा. लि.’ (आरजीपीपीएल)ने मार्चपासून हा प्रकल्प बंद केला आहे. ‘आरजीपीपीएल’मध्ये ‘गेल’ आणि ‘एनटीपीसी’ची प्रत्येकी ३२.९ टक्के तर महाराष्ट्र सरकारची १७.४ टक्के गुंतवणूक आहे. या प्रकल्पाला वित्तपुरवठा करणाऱ्या आयडीबीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीअय बँक आणि कॅनरा बँकेकडे १६.८ टक्के समभाग आहेत.