घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारताने सैन्याची कुमक वाढवली आहे, असे लष्कराचे उत्तर विभागातील कमांडर लेफ्टनंट जनरल डी.एस.हुडा यांनी सांगितले.
ते म्हणाले की, प्रत्यक्ष ताबारेषेवरून होणारी घुसखोरी हाणून पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, उन्हाळ्यात बर्फ वितळत असताना काश्मीरमध्ये घुसखोरीची शक्यता असल्यामुळे सैन्याला सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रत्यक्ष ताबा रेषेवर सैन्य वाढवण्यात आले असून पुराच्यावेळी कुंपणाची हानी झाली होती, त्याची दुरूस्ती करण्यात येत आहे असे सांगून ते म्हणाले की, प्रत्यक्ष ताबा रेषेवर घुसखोरी करणे तसे कठीण असते पण पुरामुळे कुंपणाचा काही भाग खराब झाला आहे, त्यामुळे घुसखोरी करण्यासाठी अतिरेकी त्याचा फायदा घेऊ शकतात.
लेफ्टनंट जनरल हुडा यांच्या हस्ते रेल्वेचे उत्तर विभागीय व्यवस्थापक रामनाथ मीणा यांचा निरलस सेवेसाठी सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
आम्ही प्रत्यक्ष ताबा रेषेवर अधिक कडक सुरक्षा ठेवली आहे व पोलिसांची दुसरी फळीही सज्ज आहे, याशिवाय सीमा सुरक्षा दलही घुसखोरी टाळण्यासाठी दक्षता घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.