उत्तर प्रदेशमध्ये ताजमहलवरून सुरू झालेले राजकारण अद्याप थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. ताजमहल हे गद्दारांनी बांधलेलं स्मारक असल्याचे वक्तव्य भाजप आमदार संगीत सोम यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी समाचार घेतला आहे. गुलामीची आठवण करून देणाऱ्या देशातील सर्व इमारती पाडल्या पाहिजे. मी या पूर्वीही म्हणालो होतो की, संसद भवन, कुतुबमिनार, लाल किल्ला, ताजमहलसारख्या सर्व इमारती पाडल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले.

जर तुम्हाला ताजमहल पाडायचे असेल तर माझा तुम्हाला पाठिंबा राहील, अशा शब्दांत यापूर्वीही आझम खान यांनी सरकारला टोला लगावला होता. दुसरीकडे सुब्रमण्यम स्वामी यांनीही या वादात उडी घेतली. राष्ट्रपती भवन आणि हैदराबाद हाऊससारख्या वास्तू ताब्यात घेणे म्हणजे इस्लामी आणि ख्रिश्चन ताकदींवर हिंदुंनी मिळवलेल्या विजयाची निशाणी आहे, असे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे एमआयएमचे नेता असद्दुदीन ओवेसी यांनी आता पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार नाही का, असा सवाल विचारला होता. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही भाजपवर टीका केली होती. मुगसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय असे करणाऱ्या भाजपने ताजमहालला कसे काय सोडले? त्याचे नाव कसे बदलले नाही. जर भाजपने आपल्या देशाचे नाव बदलले तर, आम्ही राहायचे कोठे? असा खोचक सवाल करताना त्यांनी भाजपवर टीका केली.

तर दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या वादावर भाष्य केले. ताजमहाल कोणी बांधला आणि कोणत्या कारणासाठी बांधला हे महत्त्वाचे नाही. तो भारतीय मजुरांच्या घामातून उभारला गेला, हे महत्त्वाचे आहे, असे आदित्यनाथ यांनी मंगळवारी म्हटले.

आमदार संगीत सोम यांनी रविवारी (१५ ऑक्टोबर) जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहालवर वादग्रस्त विधान केले होते. ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवरील डाग असल्याचे सोम यांनी म्हटले होते. ताजमहाल बनवणाऱ्या मुगल शासकांनी उत्तर प्रदेश आणि भारतातील सर्व हिंदूंचा सर्वानाश केला होता. अशा शासकांचे आणि त्यांनी उभारलेल्या इमारतींची नावे जर इतिहासात असतील तर ती बदलण्यात येतील, असे सोम म्हणाले होते.