पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(डीआरडीओ) शास्त्रज्ञांना योग्य वेळेत आणि निश्चित उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याचा सल्ला दिला. ‘डीआरडीओ’च्या मुख्यालयात झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बुधवारी ते बोलत होते. एखाद्या प्रकल्पासाठी लागणारा मुदतबाह्य कालावधी आणि प्रचंड निधी या कारणांवरून टीका करण्यात येणाऱ्या ‘डीआरडीओ’साठी मोदींचे वक्तव्य म्हणजे सूचक इशारा असल्याचे मानले जात आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी अनेक चाकोरीबाह्य कल्पना शास्त्रज्ञांसमोर ठेवल्या. डीआरडीओमध्ये असणाऱ्या एकूण प्रयोगशाळांपैकी पाच प्रयोगशाळा या केवळ ३५ वर्षांखालील तरूण शास्त्रज्ञांना संशोधनसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार मोदींनी या कार्यक्रमात मांडला. हाती घेतलेले प्रकल्प वेळेत कसे पूर्ण करावेत, हे आताच्या घडीला ‘डीआरडीओ’समोर असणारे मुख्य आव्हान आहे. भविष्यात जग कोणत्या दिशेने जाणार आहे, याचा अंदाज आपल्याला आत्ताच बांधता आला पाहिजे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी विशिष्ट उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची आपली तयारी आहे का, असा प्रश्न मोदींनी यावेळी उपस्थित केला. जागतिक विकासाच्या गतीशी मेळ साधायचा असेल तर, शास्त्रज्ञांनी निश्चित उद्दिष्ट आणि कालावधी डोळ्यासमोर ठेवून काम करणे गरजेचे असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले.