देशाला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर केवळ विकास हाच एकमेव उपाय आहे. दोन वर्षांत जे काम केले त्याहून अधिक काम करायचे असून विकास साधायचा आहे, असे सांगतानाच देशाचा कायापालट होत असताना काही जण अद्यापि जुन्याच मानसिकतेला कुरवाळत बसले असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केली. सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.
भाजपप्रणीत रालोआ सरकारच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. पुढील तीन वर्षांत पाच कोटींहून अधिक जणांना एलपीजी जोडण्या देऊ, राज्ये अधिक सक्षम करू, गरीबांना सावकारी पाशातून मुक्त करू, अशी आश्वासनेही त्यांनी दिली.
उद्या, शनिवारी नवी दिल्लीत सरकारच्या वतीने एक भव्य कार्यक्रम होणार असून त्यात अमिताभ बच्चन हेही सहभागी होणार आहेत. तसेच विविध केंद्रीय मंत्रीही देशभर फिरून सरकारच्या कामगिरीचा प्रचार करणार आहेत. दरम्यान, मोदी सरकारची दोन वर्षांची राजवट ही नैतिक भ्रष्टाचाराने बरबटल्याची टीका आपने केली आहे. तर ही दोन वर्षे निव्वळ पोकळ आश्वासनांची होती, अशी टीका काँग्रेसने केली आहे.