मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची सूचना

‘नक्षलवादी हे विविध राज्यांतील जंगलांमध्ये दडून हिंसक कारवाया करीत असले तरी देशातील विविध विद्यापीठांमध्ये त्यांचे बुद्धिजीवी पाठीराखे ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याही मुसक्या आवळणे आवश्यक आहे’, अशी ‘सूचना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.

छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर केलेल्या भीषण हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी नक्षलग्रस्त दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सूचना केली.

‘नक्षलवाद्यांच्या कारवाया ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहेच, पण त्याचसोबत त्यांचे बुद्धिजीवी पाठीराखे ही देखील चिंतेची बाब आहे. पुणे, हैदराबाद, दिल्ली, पाटणा यांसारख्या विद्यापीठांमध्ये नक्षलवाद्यांचे उदात्तीकरण करणारी शहरी मंडळी बसली आहेत. न्यायव्यवस्थेमध्ये त्यांची लुडबूड असते. नक्षलवाद्यांना ते कायदेशीर सेवा पुरवितात’ असा ठपका मुख्यमंत्र्यांनी ठेवला.

आता अधिक आक्रमक धोरण

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी, नक्षली कारवायांचा बीमोड करण्यासाठी अधिक आक्रमक धोरण अवलंबिले जाईल, असे संकेत या बैठकीत दिले. ‘नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळल्यावाचून त्यांचा नायनाट करता येणार नाही’, असेही ते म्हणाले. ‘अमेरिकेने ९/११चा हल्ला एक आव्हान म्हणून स्वीकारला. तशा हल्लय़ाची पुनरावृत्ती होऊ न देण्याचा संकल्प त्यांनी सोडला, तसेच आपल्याला करावे लागेल. सुकमाच्या हल्ल्याचे आव्हान स्वीकारावे लागेल’, असे ते म्हणाले. ‘नक्षलवाद्यंविरुद्धच्या लढय़ाच्या यज्ञात आतापर्यंत बारा हजार जणांची आहुती गेली आहे. त्यापैकी २७०० जवान होते. आपल्याला त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही. बंदुकीच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या नक्षलवाद्यांचा पूर्णत: निपात होण्याचा दिवस फार दूर नाही’, अशी पुस्ती राजनाथ यांनी जोडली.

‘गरिबीमुळेच नक्षलवादाचा कर्करोग फोफावतो. म्हणून तर नक्षली त्यांच्या भागांमध्ये विकास होऊ देत नाहीत. रस्ते बांधू देत नाहीत, शाळा-दवाखान्यांची उभारणी करू देत नाहीत. त्यांचा हा विकासविरोधी चेहरा उघडा पाडायला हवा’, असे ते म्हणाले. ‘दिल्ली, रायपूर आणि रांचीमध्ये बसून या लढाईला यश मिळणार नाही. ते हल्ले करेपर्यंत आपण शांत बसणार का? आपल्याला चुकांपासून शिकले पाहिजे. धोरणांमध्ये, रणनीतीमध्ये, जवानांच्या तैनातीमध्ये, नक्षलविरोधी कारवायांमध्ये, विकासकामांमध्ये आक्रमकता आणली पाहिजे’, असे त्यांनी अधोरेखित केले.

या बैठकीस गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, किरेन रिजूजू, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहसचिव राजीव मेहर्षि यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक, पोलिस महासंचालक सतीश माथूर उपस्थित होते.

नक्षलींइतकेच समर्थकही धोकादायक

नक्षली प्रचाराची लढाई देशातील काही विद्यापीठांत त्यांचे समर्थक लढत आहेत. हिंसक कारवाया करणारे नक्षलवादी जेवढे धोकादायक आहेत, तेवढेच त्यांचे समर्थकही धोकादायक आहेत, असे उद्गार फडणवीस यांनी काढले.

समाधानअष्टसूत्री

नक्षलींविरोधात आक्रमक होण्यासाठीची ‘समाधान’नामक अष्टसूत्री राजनाथसिंह यांनी यावेळी नमूद केली. चाणाक्ष नेतृत्व, आक्रमक रणनीती, प्रेरणा आणि प्रशिक्षण, कार्यक्षम गुप्तचर यंत्रणा, तंत्रज्ञानाचा वापर, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व वैशिष्टय़पूर्ण रणनीती आणि नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळणे आदींचा त्यात समावेश आहे.