योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता आम आदमी पक्षातील त्यांच्या समर्थकांवरही पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्यात येऊ लागली आहे. लोकसभेतील ‘आप’चे गटनेते धरमविरा गांधी यांना त्या पदावरून हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी अरविंद केजरीवाल यांचे कट्टर समर्थक भगवंत मान यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यादव, भूषण आणि अजित झा यांची सोमवारी रात्रीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर मंगळवारी लगेचच धरमविरा गांधी यांना गटनेते पदावरून दूर करण्यात आले. यादव आणि भूषण यांना पक्षातील वरिष्ठ पदांवरून हटविण्यात आल्यानंतर त्यांनी पक्षनेतृत्त्वावर टीका केली होती. २८ मार्च रोजी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतूनही त्यांनी सभात्याग केला होता. त्याचवेळी यादव गटाकडून बोलावण्यात आलेल्या स्वराज संवाद मेळाव्यात त्यांनी आपला संदेश पाठवून अप्रत्यक्ष सहभाग घेतला होता. यामुळेच त्यांना गटनेते पदावरून दूर करण्यात आले असल्याचे समजते.
धरमविरा गांधी यांना पदावरून हटविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचा मान ठेवला पाहिजे, असे पक्षाचे नेते आशुतोष यांनी पत्रकारांना सांगितले.