काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकच्या पक्ष प्रभारीपदावरून काढण्यात आलं आहे. आता ए. चेल्लकुमार हे गोव्याचे प्रभारी असणार आहेत तर कर्नाटकच्या प्रभारीपदी के सी वेणुगोपाल यांची नेमणूक झाली आहे.

फेब्रुवारील महिन्यात झालेल्या गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळालेल्या असूनसुध्दा सत्ता भाजपच्या हाती गेली. यामुळेस काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली होती. बहुमताचा आकडा २१ असताना काँग्रेसच्या वाट्याला १७ जागा आल्या तरीही त्यांना सरकार बनवण्यात अपशय आलं होतं. यामुळेच दिग्विजय सिंह यांची उचलबांगडी झाली आहे.

गोव्यामधल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद होते. पण सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर छोट्या पक्षांची मदत घेत २१ चा आकडा गाठणं १३ जागा मिळालेल्या भाजपपेक्षा १७ जागा मिळालेल्या काँग्रेसला सहज शक्य होतं. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी गोव्याच्या राज्यापालांना सरकारस्थापनेचं पत्रही तयार करण्यात आलं होतं पण दिग्विजय सिंह यांच्या सांगण्यावरून राज्यपालांकडून सरकारस्थापनेचा प्रस्ताव येण्याची वाट पाहण्याचे ठरवण्यात आलं. प्रघातानुसार राज्यपाल हे सर्वात मोठ्या पक्षाला सरकारस्थापनेचं निमंत्रण देतात. पण या सगळ्या कालावधीत भाजपने लहान लहान पक्षांची मोट बांधत बहुमताचा आकडा गाठलाल आणि सरकार बनवलं. यानंतर दिग्विजय सिंग यांनी गोव्याच्या जनतेची माफी मागितली.

काँग्रेसच्या जखमेवर मीठ म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या भाषणात दिग्विजय सिंहांचे आभार मानले होते. दिग्विजय सिंग यांनी काहीही न केल्याने गोव्यात भाजपलास सत्ता स्थापन करण्यात यश आलं अशी कोपरखळी मनोहर पर्रीकर यांनी त्यांना दिली होती.