सततच्या पराभवामुळे आधीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यावर टीकेचा भडीमार होत असतानाच आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीही स्पष्टपणे आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. इतके दिवस गांधी कुटुंबीयांचा विरोधात ब्र सुद्धा न काढणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही काही प्रश्न उपस्थित करीत पक्षश्रेष्ठींचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केरळ आणि आसाममधील पराभव निराश करणारा असला, तरी तो अनपेक्षित नक्कीच नव्हता, असे म्हटले आहे.
दिग्विजय सिंह म्हणतात, लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना पराभवाची कारणमीमांसा आणि पुढे कशी वाटचाल करता येईल, याबद्दलचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी नेत्यांशी चर्चाही केली होती. २० फेब्रुवारी २०१५ पर्यंत हे अहवाल सादर करायचे होते. आम्ही सर्वांनी डेडलाईनपूर्वीच आमचे अहवाल सादर केले. आज मे २०१६ आला आहे. पण अहवालातील निष्कर्षांवर कृती काहीच झालेली नाही. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की पक्षाने पराभवांचे परीक्षण करण्यात किती वेळ घालवायचा, त्यावर कृती कधी करायची? आम्ही सर्वजण आता कृतीची वाट पाहात आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
आसाम आणि केरळमधील पराभवानंतर काँग्रेसचे आता फक्त सात राज्यांमध्ये सरकार आहे. त्यापैकी कर्नाटक वगळता इतर सर्व राज्य ही लहान आहेत. पक्षाच्या या अभूतपूर्व घसरणीमुळे पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात नवी आघाडी उघडण्यासाठी वाटाघाटी करतानाही काँग्रेसची अडचण होणार आहे.