गुजरात सरकारच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना वाचनासाठी अनिवार्य असलेल्या ‘तेजोमय भारत’ या पुस्तकात प्राचीन काळात भारताने केलेल्या वैज्ञानिक प्रगतीबाबत तथ्यहीन दावे केले आहेत. हे दावे भूगोल, विज्ञान, इतिहास, संस्कृती यांचा विपर्यास करणारे आहेत. रा.स्व. संघाच्या ‘विद्याभारती’ या शैक्षणिक संघटनेने शिक्षणातही पुराणकथा आणल्याचे स्पष्ट झाले असून अशा आठ पुस्तकांच्या मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास संदेशही देण्यात आला आहे.
स्कंद पेशी (स्टेम सेल) शोधून काढल्याचे श्रेय अमेरिका घेते, पण डॉ. बाळकृष्ण गणपत मातापूरकर यांनी अगोदरच अशा पेशींपासून शरीरांचे अवयव तयार करण्याचे पेटंट घेतले होते. मातापूरकर यांना महाभारतातून प्रेरणा मिळाली होती. कुंतीला सूर्यापासून पुत्र झाला. गांधारीला दोन वर्षे मूलबाळ नव्हते तेव्हा तिने अशाच तंत्राचा आधार घेतला व तिच्या गर्भातून मांसाचा गोळा बाहेर आला; नंतर महर्षी द्वैपायन व्यास यांना बोलावण्यात आले. त्यांनी तो मांसाचा गोळा थंड टाकीत काही औषधांसमवेत ठेवला, नंतर त्या मांसाचे शंभर तुकडे केले व ते १०० पेटय़ांमध्ये दोन वर्षे तुपात ठेवले. दोन वर्षांनी त्यातून १०० कौरवांचा जन्म झाला. हे वाचून मातापूरकरांना स्कंद पेशीची कल्पना सुचली. भारतात हे तंत्र हजारो वर्षांपूर्वी माहिती होते असे या पुस्तकाच्या पान ९२-९३ वर म्हटले आहे. विज्ञान प्रगतीचा आढावा घेणाऱ्या कुणाही जाणकाराला सहजासहजी पटणाऱ्या या गोष्टी नाहीत.
दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजनचा शोध जॉन लॉगी बेअर्ड याने १९२६ मध्ये लावला होता हे आपल्याला माहित आहे, पण त्या आधी संजयने दिव्यदृष्टीने महाभारताचे वर्णन केले. त्याने हस्तिनापूरच्या राजवाडय़ात बसून महाभारताच्या युद्धाचा वृतान्त अंध धृतराष्ट्राला कथन केला, हे दूरचित्रवाणीचे प्राचीन रूपच होते, असे या पुस्तकात पान ६४ वर म्हटले आहे.
आज आपण ज्याला मोटरकार म्हणतो ती वेदिक काळातही उपलब्ध होती; त्या वेळी त्याला अनश्व रथ म्हणत असत. अनश्व रथ हा घोडय़ांविना ओढला जात असे. ही ऋग्वेदातली कथा असल्याचे पान ६०वर म्हटले आहे.  १२५ पानांच्या ‘तेजोमय भारत’ या पुस्तकाचा वापर पूरक वाचनासाठी केला जाणार असला तरी त्यामुळे सत्यापलापाचा प्रश्न आहे. गुजरात पाठयपुस्तक निर्मिती मंडळाने ते प्रकाशित केले आहे. दीनानाथ बत्रा यांनी लिहिलेल्या इतर आठ पुस्तकांसमवेत हे पुस्तक प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना दिले जात आहे. बत्रा हे रा.स्व.संघाच्या ‘विद्याभारती’ या संस्थेचे कार्यकारी सदस्य आहेत. त्यांची ही पुस्तके गुजरातीत भाषांतरित केली आहेत. या प्रत्येक पुस्तकावर नरेंद्र मोदी यांचा खास संदेश आहे. अध्यात्मिक भारत, अखंड भारत, विज्ञानमय भारत, समर्थ भारत अशी या पुस्तकातील काही प्रकरणे आहेत. हर्षद शहा हे पुस्तकातील मजकूर सल्लागार आहेत. ऋता परमार, रेखा चुडासमा यांनी या पुस्तकांच्या आढावा समितीत काम केले आहे. शहा यांनी सांगितले की, आम्ही विद्यार्थ्यांना यातून आपली संस्कृती, वारसा, अध्यात्म, देशभक्ती याबाबत नवीन दृष्टी दिली आहे.