जीवाश्मांच्या क्ष किरण अभ्यासातील निष्कर्ष
पृथ्वीवर साधारण १९ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या सायनॉसॉरस या डायनॉसॉर प्रजातीच्या जबडय़ातील हाडांचे जीवाश्म चीन, अमेरिका व कॅनडातील वैज्ञानिकांना सापडले असून त्यांच्या मते दातदुखी असलेला डायनॉसॉर हा सर्वात पूर्वीच्या काळातील प्राणी होता.
वैज्ञानिकांनी चीन सायन्स बुलेटिनमध्ये प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात असे म्हटले आहे, की आम्ही डायनॉसॉरच्या जबडय़ाच्या हाडांची क्ष किरण तपासणी केली, त्यात त्यांना दातदुखी होती असे दिसून आले आहे. डायनॉसॉरच्या खाण्यात काही वेळा फार कडक पदार्थ येत असत व त्यामुळे त्यांच्या हिरडय़ांनाही इजा होत असे.
 मांसाहारी डायनॉसॉर दात गमावित असत ही सर्वमान्य बाब असली, तरी आम्ही अभ्यास केलेली डायनॉसॉरची प्रजात ही वेगळी आहे, असे झिंग लिडा यांनी म्हटले आहे.
सायनॉसॉरसच्या दाताच्या खोबणी या पूर्णपणे भरलेल्या होत्या. याचा अर्थ त्यांचे दात बाहेरील पदार्थामुळे नव्हे तर खरोखर दातांच्या समस्येमुळे खराब होत असत, असे झिंग यांनी ‘चायना डेलीला’ सांगितले.
चीनमधील युनान प्रांतात ल्युफेंग खोऱ्यात २००७ मध्ये सायनॉसॉरस या डायनॉसॉरच्या कवटीचे जीवाश्म सापडले होते. त्यांच्या वरच्या जबडय़ात १३ ते १४ दात असावेत असे दिसून आले आहे. या जीवाश्मात दोन तुटलेले दात जसेच्या तसे आहेत.
कॅनेडियन जीवाश्मशास्त्रज्ञ फील आर.बेल यांनी सायनॉसॉरसच्या जबडय़ाच्या हाडाची तुलना लेमूरच्या जबडय़ाच्या सांगाडय़ाशी केली असून त्यांचे मते लेमूर जेव्हा कडक पदार्थ खात असत, तेव्हा त्यांच्यातही सायनॉसॉरससारख्याच दाताच्या समस्या उद्भवत असत.