पंतप्रधान कार्यालयाच्या काम करण्याच्या पद्धतीने आपण अत्यंत निराश झालो असल्याचे ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार विजेते भारतीय वन सेवेतील अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजीव चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारकडून सध्या मिळत असलेल्या वागणुकीबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
भ्रष्टाचाराविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून मी ‘एम्स’मध्ये काम केले आणि तिथला भ्रष्टाचार उघडकीस आणल्याचे सांगून संजीव चतुर्वेदी यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या कार्यपद्धतीमुळे आपण निराश झालो असल्याचे सांगितले. केवळ स्वतंत्र न्यायव्यवस्थेमुळेच माझ्यावरील संकटांतून मी निभावून नेले, असेही ते म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संजीव चतुर्वेदी यांना दिल्लीचे मुख्य दक्षता आयुक्त म्हणून काम करण्यासाठी निमंत्रित केले आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप केंद्र सरकारने मंजुरी दिलेली नाही. संजीव चतुर्वेदी सध्या एम्समध्ये उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्याकडे कोणतेच काम सोपविण्यात आलेले नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा जोपर्यंत मंजुरी देत नाहीत, तोपर्यंत संजीव चतुर्वेदी यांना अन्य जबाबदारी स्वीकारता येणार नाही.
गेल्यावर्षीच त्यांच्याकडून ‘एम्स’च्या दक्षता अधिकारी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता. ‘एम्स’मधील भ्रष्ट अधिकाऱयांनी वरिष्ठांकडून दबाव आणल्यानंतर चतुर्वेदी यांच्याकडून हा कार्यभार काढून घेण्यात आला. ‘एम्स’मध्ये दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत असताना साधारणपणे २०० प्रकरणांची चौकशी करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. या पैकी ७८ प्रकरणातील दोषींना शिक्षाही ठोठावण्यात आली होती. त्याचबरोबर २० प्रकरणे अधिक तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडेही सोपविण्यात आली होती.