नासाच्या खगोलवैज्ञानिकांनी आपल्या सौरमालेबाहेर पृथ्वीसारखा बाह्य़ग्रह शोधून काढला असून तो पृथ्वीपेक्षा मोठा असून वैज्ञानिक माहितीसाठी सोन्याची खाण आहे.
एचडी २१९१३४ बी असे या बाह्य़ग्रहाचे नाव असून तो वैज्ञानिक माहितीसाठी सोन्याची खाण सिद्ध होणार आहे. एचडी २१९१३४ बी हा बाह्य़ग्रह मातृताऱ्यापासून जवळ असून तेथे जीवसृष्टी असण्यास अनुकूल स्थिती आहे, तो २१ प्रकाशवर्षे दूर आहे. पृथ्वीचा आतापर्यंतचा सर्वात जवळचा असा तो बाह्य़ग्रह असून ताऱ्याभोवतीच्या अधिक्रमणातूनच त्याचा शोध लागला आहे. तो संशोधनासाठी सोपा आहे कारण तो जवळ आहे. हा ग्रह वेगळ्या गुणधर्माचा असून त्याचे निरीक्षण महत्त्वाते ठरेल असे नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या स्पिट्झर दुर्बिणीचे प्रकल्प वैज्ञानिक मायकेल वेर्नर यांनी सांगितले.
असा खडकाळ व पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह हा महापृथ्वी ग्रहांच्या गटात मोडणारा आहे. आतापर्यंत ज्या बाह्य़ग्रहांचा शोध लागला आहे ते शेकडो प्रकाशवर्षे दूर असून हा ग्रह म्हणजे परसदारी असल्यासारखे आहे असे हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे लार्स बुशावे यांनी सांगितले. एचडी २१९१३४ बी या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या साडेचार पट असून तो ताऱ्याभोवतीची प्रदक्षिणा तीन दिवसांत पूर्ण करतो.
त्याचे ताऱ्यासमोरून अधिक्रमण होत असताना त्याचे निरीक्षण करणे सोपे होणार आहे. जर या ग्रहावर वातावरण असेल तर त्यातील रसायने प्रकाशात बघता येतील. या ग्रहाचा शोध पहिल्यांदा कॅनरी आयलंड येथील गॅलिलिओ नॅशनल टेलिस्कोपच्या मदतीने लावण्यात आला होता. ही दुर्बीण इटलीची आहे. या ग्रहाच्या शोधाची निश्चिती मात्र नासाच्या स्पिट्झर दुर्बिणीने केली आहे.

’एचडी २१९१३४ बी ग्रह
’पृथ्वीला जवळचा बाह्य़ग्रह
’अंतर २१ प्रकाशवर्षे
’परिभ्रमण काळ ३ दिवस
’वस्तुमान पृथ्वीच्या साडेचार पट
’अधिक्रमणामुळे निरीक्षण सोपे
’वैज्ञानिक स्वरूपाची माहिती मिळणार
’जीवसृष्टीस अनुकूल स्थिती