पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निवासस्थानी जाऊन भोजन केले. सध्या कोंडीत सापडलेल्या संसदेत आपल्या महत्त्वाच्या आर्थिक विधेयकांसाठी पाठिंबा मिळवण्याच्या एनडीए सरकारच्या प्रयत्नांच्या पाश्र्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मद्रास विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय हातमाग दिवस कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर पंतप्रधान थेट जयललिता यांच्या पोज गार्डन येथील आलिशान निवासस्थानी रवाना झाले. अण्णाद्रमुकच्या सर्वोच्च नेत्या असलेल्या जयललितांनी पंतप्रधानांना भोजनाचे आमंत्रण दिले होते व ते त्यांनी स्वीकारले, असे सूत्रांनी सांगितले. या भेटीत जयललिता यांनी पंतप्रधानांशी कर्नाटक व केरळसोबत आंतरराज्य नदीवाटपाच्या वादासह तामिळनाडूशी संबंधित मुद्दय़ांबाबत चर्चा करून एक निवेदनही दिल्याचे समजते.