शेतकऱयांच्या जीवनापेक्षा मोठे काही नाही, असे सांगत शेतकऱयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सर्व सूचना खुल्या मनाने ऐकण्यास आपण तयार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. दिल्लीमध्ये काल घडलेल्या घटनेमुळे आपणही व्यथित झालो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये ‘आप’च्या सभेत राजस्थानमधील शेतकऱयाने सर्वांसमक्ष झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी लोकसभेमध्ये या विषयावर सुमारे दोन तास चर्चा करण्यात आली. या चर्चेला गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उत्तर दिले. त्यानंतर मोदी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
शेतकरी आत्महत्या हा देशासाठी चिंतेचा विषय आहे. प्रत्येक सरकारने त्यांच्या कार्यकाळात शेतकऱयांसाठी शक्य ती मदत केली आहे. ही समस्या जुनी आणि व्यापक स्वरुपाची आहे. त्यामुळे गेल्या सरकारांच्या काळात आणि आमच्याही सरकारच्या कार्यकाळात काय कमी राहिले, यावर गंभीरपणे चर्चा व्हायला हवी, असे मोदी यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्येवरून कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये, असे राजनाथ सिंह यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितले. दिल्लीमध्ये घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी संसदमार्ग पोलीस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करणारे गजेंद्रसिंह झाडावर चढल्यानंतर तेथील पोलीसांनी नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली होती आणि अग्निशामक दलाची शिडी मागविण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱयांसाठी आवश्यक मदत देण्याची सूचना राज्य सरकारांना करण्यात आली आहे. राज्य सरकारांना आर्थिक पाठबळ देण्यास केंद्र सरकार तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.