चार देशांच्या प्रतिनिधींची बुधवारी बैठक

अफगाण तालिबान्यांसमवेत शांतता कराराची चर्चा करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखाव्या याबाबत येथे या आठवडय़ात अमेरिका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीन यांच्यात चर्चा होणार आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात चर्चेला सुरुवात होईल, असे चार देशांच्या समन्वय गटाने २३ फेब्रुवारी रोजी काबूलमध्ये झालेल्या बैठकीनंतर जाहीर केले होते. मात्र तालिबान्यांनी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यानंतर होणारी ही पहिलीच बैठक आहे.

इस्लामाबादमध्ये १८ मे रोजी होणाऱ्या बैठकीला अमेरिका आणि चीनचे विशेष दूत आणि पाकिस्तान व अफगाणिस्तानचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शांतता चर्चा सुरू होण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्न कसे करावे यासंदर्भात ही चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तालिबान आणि अफगाणिस्तानचे अधिकारी यांच्यातील प्राथमिक चर्चेनंतर चार देशांच्या गटाची बैठक घेण्याचे प्रथम ठरले होते. मात्र गेल्या महिन्यांत काबूलवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर ही प्रक्रिया थांबली होती. चर्चेत सहभागी न होण्याचे तालिबानने जाहीर केल्याने त्यांना तडजोड करण्यात स्वारस्य नसल्याचे जाहीर करावे, अशी अफगाणिस्तानची इच्छा असल्याचे ‘दी एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने म्हटले आहे.