मध्य प्रदेश सरकारचा ज्योतिषावर आधारित बाह्य़ रुग्णविभागाचा अनोखा प्रयोग

मध्य प्रदेश सरकारने बाह्य़रुग्ण विभागांमध्ये (ओपीडी) ज्योतिषांच्या मार्फत रोगनिदान व प्रश्न सोडवण्याची सोय केली असून आधुनिक वैद्यकाला कुडमुडय़ा ज्योतिषाची जोड देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. महर्षी पतंजली संस्कृत प्रतिष्ठान या भोपाळमधील सरकारी संस्थेच्या माध्यमातून हे ज्योतिषी रुग्णालयांमध्ये सल्ला देणार आहेत. आठवडय़ातून दोनदा तीन ते चार तास ज्योतिषी, वास्तू सल्लागार, हस्तरेषा तज्ज्ञ व वेदिक कर्मकांडातील तज्ज्ञ रुग्णांना त्यांच्या समस्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. रुग्णाची कुंडली पाहून ते जीवनरेषाही किती लांब आहे वगैरे सांगणार आहेत. भोपाळमध्ये रेडक्रॉस इमारतीजवळ असलेल्या योगा सेंटर इमारतीत ज्योतिष सल्ल्यासह रुग्णसेवा सुरू होत आहे, असे महर्षी पतंजली संस्कृत प्रतिष्ठानचे संचालक पी. आर. तिवारी यांनी ‘दी न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

बाह्य़ रुग्ण विभागात जसे कनिष्ठ डॉक्टर वरिष्ठ डॉक्टरांच्या हाताखाली काम करतात, तसे नवखे ज्योतिषी अनुभवी ज्योतिषविदांना मदत करणार आहेत. अ‍ॅस्ट्रो ओपीडी म्हणजे ज्योतिषावर आधारित बाह्य़ रुग्णविभाग असे या नव्या सेवेचे नाव आहे. महर्षी पतंजली संस्कृत प्रतिष्ठानने काही आठवडय़ांपूर्वी ज्योतिष, वास्तू सल्ला, पुरोहित या तीन प्रकारच्या पदविका सुरू केल्या आहेत. त्यातील विद्यार्थी या अ‍ॅस्ट्रो ओपीडीत वरिष्ठ ज्योतिषांना मदत करतील. जर तुम्ही तेथे ज्योतिषाचे निदान मागितलेत तर पाच रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. तिवारी यांच्या मते ज्योतिष हे विज्ञान असून त्यातून समस्यांवर हमखास मार्ग निघतो.

रुग्णाची ग्रहस्थिती पाहून यात सल्ला दिला जाईल, कुंडली पद्धत वापरली जाईल. राज्यात संस्थेच्या १३८ संस्कृत शाळांतही अ‍ॅस्ट्रो ओपीडी सुरू होणार आहे. यातील पदविका अभ्यासक्रम हे अकरावी व बारावीच्या समकक्ष असतील.