निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनासंबंधी होणारा विलंब टाळण्यासाठी सर्व मंत्रालयांनी यासंबंधी आलेल्या तक्रारी दोन महिन्यांच्या आत निकाली काढाव्यात, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.
निवृत्तिवेतनधारकांच्या प्रश्नावर ६६६.स्र्ॠस्र्१३ं’.ॠ५.्रल्ल हे संकेतस्थळ निवृत्तिवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागातर्फे चालवण्यात येते. या ठिकाणी निवृत्तिवेतनासंबंधित तक्रारी तसेच इतर प्रकरणे प्राप्त केली जातात. मात्र प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर वेळेत तोडगा काढला जात नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रकरणे प्रलंबित राहत असल्याचे आढळून आले. अर्जदाराला तक्रारीची पोच तातडीने देण्यात यावी, असेही निवृत्तिवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.
निवृत्तिवेतनधारकांनी आपल्या अडचणींबाबत संबंधित मंत्रालयाच्या विभागीय अधिकारी आणि  निवृत्तिवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाला लेखी कळवावे. तसेच संबंधित मंत्रालयाने अर्जदाराच्या प्रश्नावर दोन महिन्यांच्या आत कार्यवाही करावी, अशी सूचना नव्याने प्रसिद्ध केलेल्या आदेशात केली आहे.  सध्या सुमारे ३० लाख केंद्र सरकारच्या अखत्यारितील निवृत्तिवेतनधारक आहेत.