नऊ महिने पोटात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलावर हात उगारताना आईला होणा-या वेदना किती असतात याची कल्पना फक्त आईच करू शकते. आपल्या मुलाच्या डोळ्यात एक अश्रू जरी आला तरी आईच्या काळजाचे तुकडे पडतात पण हा व्हिडिओ पाहून एखादी आई इतकी निष्ठुर कशी बनू शकते असा प्रश्न अनेकांना पडेल. धड ‘आई’ शब्दही न बोलू शकणा-या आपल्या दीड वर्षांच्या मुलाला एक आई इतकी निर्दयपणे मारत असल्याचा हा व्हिडिओ आहे. या आईने आपल्या मुलाला बिछान्यावर आदळले, त्याच्या पाठीवर फटके मारले. मुल वेदनेने आक्रोश करत असताना देखील या पाषाणहृदयी आईला पाझर फुटला नाही. हे बाळ असह्य वेदनेने आक्रोश करत होते पण आईने मात्र त्याला मारणे थांबवले नाही. या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. उत्तरप्रदेशमधल्या बरेलीमधली ही घटना आहे. आपल्या चिमुकल्याच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहून या मुलाला मारहाण केली जात असल्याचा संशय मुलाच्या वडिलांना आला होता  त्यामुळे कोणालाही न सांगता त्यांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला. हे फुटेज पाहून त्यांचा संशय सत्यात उतरला. मुलाला पत्नी मारहाण करत असल्याचा संशय आल्याने मी घरात कॅमेरा लावला पण जे दृश्य समोर आले ते खूपच क्लेशदायक होते अशी प्रतिक्रिया महिलेच्या पतीने एएनआयला दिली.  आपल्या पतीसोबतचे संबध बिघडले असल्यामुळे हा राग महिलेने मुलावर काढला असल्याचे समजते. दरम्यान मुलाला मारहाण केल्याप्रकरणी पत्नीला न्यायालयात खेचण्याचा इशाराही या पतीने दिला आहे.