जगभरात आज भारताची गणना बलाढ्य देशांमध्ये होते. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे भारताला आता कुणाची मेहरबानीची गरज नको, तर बरोबरीचे स्थान हवे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. ते शनिवारी लंडनमधील वेम्बले स्टेडियममध्ये बोलत होते. यावेळी मोदींचे भाषण ऐकण्यासाठी हजारो भारतीय उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. आज मोदींच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरुन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी वेम्बली स्टेडियमवर सुमारे ६० हजार भारतीयांशी संवाद साधला.
देशातील विविधता हीच भारताचा अभिमान आणि ताकद आहे. विविध धर्मांचे आणि भाषा बोलणारे लोक एकोप्याने कशाप्रकारे नांदू शकतात, याचे भारत हा उत्तम उदाहरण असल्याचे मोदींनी यावेळी सांगतिले . भारत हा विविधतापूर्ण आहे. हीच विविधता आमचा अभिमान, ताकद आणि विशेषता असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. आम्हाला आमच्या लहान देशांचा कारभार हाताळताना अनेक अडचणी येतात, मग तुमच्या १२५ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात लोक इतक्या एकोप्याने आणि शांततेने कसे काय नांदतात, असा प्रश्न मला जगभरातील अनेक नेते विचारत असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.