द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमूक) नेते एम.के.स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे. मोदी हे हिंदी भाषा बळजबरीने थोपवत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी हे घटनेचे आणि बिगर हिंदी भाषिक लोकांच्या अधिकाराचे हनन करत असल्याचे ते म्हणाले. स्टॅलिन यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून मोदींवर आपला रोष व्यक्त केला आहे. भाजप सरकारने राष्ट्रपतींकडून परवानगी घेऊन विमानतळावर हिंदी भाषेत घोषणेची सुरूवात केली आहे. प्रसिद्धीपत्रके आणि जाहिरातीही हिंदीमध्ये देण्यात येत आहे. देशभरातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये हिंदी सक्तीचे केले आहे, असे या व्हिडिओत म्हटले आहे. पंतप्रधानांनी इंडियाला ‘हिंडिया’ बनवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा हिंदीविरोधी नवीन ताकदीचा उदय होईल, असा इशाराही त्यांनी या व्हिडिओतून दिला आहे.

केंद्र सरकारने सर्व योजनांचे नामकरण हे हिंदी किंवा संस्कृत भाषेत केले आहे. नंतर त्या योजनांच्या नावांचा अनुवाद करावा लागतो, असा आरोप त्यांनी केला. या वेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गांचाही उल्लेख केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर हिंदीमध्ये लिहिण्यावरून मोठा गोंधळ झाला होता. त्यावर पूर्वी इंग्रजीमध्ये नाव लिहिलेले असत.

प्राथमिक शाळेपासून ते संसदेपर्यंत नागरिकांवर हिंदी भाषा थोपवली जात आहे. भाजप सरकार देशातील बिगर हिंदी भाषिकांची फसवणूक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. घटनेत सर्व नागरिकांना बरोबरीचे अधिकार देण्यात आले आहेत. पण केंद्र सरकार घटनेचे उल्लंघन करत आहे, असेही ते म्हणाले.

घटनेच्या आठव्या अनुसूचीनुसार, भारतातील सर्व भाषा ज्यामध्ये तामिळचाही समावेश आहे, त्यांना अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा द्रमुक आणि सर्व बिगर हिंदी भाषेच्या लोकांच्या वतीने आपण याचा विरोध करत असल्याचे त्यांनी म्हटले.