लोकशाहीत मतदानाला न जाणे म्हणजे राज्यपद्धतीतील उणिवा दाखवण्याचा नैतिक अधिकार गमावण्यासारखे आहे, असे भारतीय वंशाची अंतराळयात्री सुनीता विल्यम्स हिने आज येथे सांगितले. तिच्या दहा दिवसांच्या भारत दौऱ्याची आज सांगता झाली.
सुनीता विल्यम्स हिने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्यावेळी अंतराळात असतानाही मतदान केले होते. सुनीताने सांगितले की, युवकांनी निवडणुकीच्यावेळी मतदानात सहभागी झाले पाहिजे. मतदानाचा हक्क बजावणे ही एक गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे असे मी मानते. जर तुम्ही मतदान केले नाहीत तर तुम्हाला व्यवस्थेविषयी तक्रारी करण्याचा अधिकार नाही, असे सुनीता म्हणाली.
गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीतील कार्यक्रमात तिला ‘मानद डॉक्टरेट’ पदवीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ती बोलत होती. सुनीताने महिलांमध्ये सर्वाधिक काळ अंतराळात वास्तव्य करण्याचा विक्रम केला आहे.
ती म्हणाली की, लोकशाहीत बदल फार हळू होतात हे खरे आहे पण ते बदल चांगले असतात. वेगाने होणारे बदल हे धोकादायक ठरतात त्यामुळे लोकशाहीत होणारे बदल कमी वेगाने होत असले तरी ते उत्क्रांत प्रक्रियेने होत असल्याने सकारात्मक असतात व समाजालाही पोषक असतात.
विद्यापीठाचे कुलगुरू अक्षय अग्रवाल यांनी सुनीताला डॉक्टरेट पदवी प्रदान केली. या वेळी तिने विद्यार्थ्यांंशी संवादही साधला. तुझ्या मते यशाची व्याख्या काय, असे विचारले असता ती म्हणाली की, तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी करायला मिळणे म्हणजे यश. तुम्हाला ज्याचा अभ्यास करावासा वाटतो तो करायला मिळणे, ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद आहे त्या मिळणे. पण यशाचे असे कुठले सूत्र सांगता येणार नाही. जे तुम्हाला साध्य करायचे आहे त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी हवी.
अंतराळातून मतदान!
सुनीता विल्यम्सने मतदानासाठी मांडलेली आग्रही भूमिका म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ या पठडीतली नाही. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी सुनीता अंतराळात होती. मात्र तेथून तिने मतदान केले होते. एका अर्थी अंतराळातून मतदान करण्याचा विक्रम नोंदविणारी ती पहिली महिला मतदारही आहे!