अमेरिकी काँग्रेसच्या २५ सदस्यांची क्लिंटन यांच्याकडे मागणी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी २००२मधील दंगलींतील पीडितांना न्याय देण्यासाठी योग्य प्रयत्न केले नसल्याने त्यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्याचा निर्णय पुढेही चालूच ठेवावा, अशी मागणी अमेरिकी काँग्रेसच्या २५ सदस्यांनी देशाच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे केली आहे.
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ इच्छिणारे मोदी यांना आपल्या देशाचा व्हिसा देण्यात काहीही अडचण नाही, असे ब्रिटन आणि अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. यावर भाजप आणि मोदी समर्थकांत आनंदाचे वातावरण होते. परंतु, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या २५ प्रतिनिधींना याला कडाडून विरोध केला आहे. ‘गुजरातमधील २००२च्या दंगलीतील पीडितांना अजूनही न्याय मिळू शकलेला नाही. त्यामुळे मोदी यांना व्हिसा देऊ नये,’ अशी मागणी या सदस्यांनी क्लिंटन यांना २९ नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे जो पिट्स आणि फ्रँक वोल्फ यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे पत्र प्रसारमाध्यमांसमोर उघड केले. त्यांच्यासमवेत गुजरात दंगलीतील पीडितांचे काही कुटुंबीयही होते.‘मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा दावेदार बनले असताना त्यांना व्हिसा नाकारण्यासंदर्भातील धोरणांत बदल केल्यास त्यांना फायदा मिळेल.
तसेच ते व त्यांचे सरकारमधील सहकारी दंगलीसंबंधातील तपासात अडथळे आणू शकतील,’ असे या पत्रात म्हटले आहे.     

मोदींच्या पंतप्रधानपदासही विरोध
मोदी हे दंगलींशी संबंधित असल्याचे माहीत असूनही भारतातील काही पक्ष (भाजप) त्यांना बढती देण्याचा विचार करत आहेत, ही अतिशय खेदजनक बाब आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. मोदी हे भारताच्या आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी प्रयत्नशील आहेत व त्यासाठी विविध राष्ट्रांतील नेतेमंडळींशी भेटीगाठी करू इच्छित आहेत. अशात अमेरिकेतही येण्याचा त्यांचा बेत असावा, असे सांगत या सदस्यांनी मोदींना पंतप्रधान बनवण्याच्या चर्चेलाही विरोध केला आहे.

भाजपची अमेरिकेवर टीका
अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यांच्या मागणीला आपण महत्त्व देत नाही, असे सांगत भाजपने मोदी यांची पाठराखण केली. अमेरिका मोदींबाबत काय विचार करते, याची आम्हाला फिकीर नाही. मोदींना कोणताही व्हिसा अथवा आशीर्वाद आवश्यक असतील, तर ते गुजरातच्या जनतेकडून अपेक्षित आहेत, असे पक्षाचे नेते बलबिल पुंज यांनी मंगळवारी म्हटले.