गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वडेरा यांनी केलेले एक विधान अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. माझ्या पालकांनी माझ्यासाठी पुरेशा गोष्टी करून ठेवल्या आहेत, त्यामुळे मला मोठे होण्यासाठी माझी पत्नी प्रियांकाची (गांधी) गरज नाही, असे रॉबर्ट यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. माझ्याकडे एक चांगले आणि नेहमी माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे कुटुंब आहे. त्यामुळे माझ्याविषयी जे काही छापले जाते, त्याकडे मी फारसे लक्ष देत नाही, कारण मला सत्य ठाऊक आहे, असे वडेरा यांनी म्हटले. यावेळी वडेरा यांना राजकारणात उतरणार का, असा प्रश्नदेखील विचारण्यात आला. त्यावर मी सध्या ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली असून, भविष्यात परिस्थिती पाहून निर्णय घेईन असे वडेरांनी सांगितले. तुम्ही नाही कधीच म्हणत नाही. त्यामुळे भविष्यात माझ्यासाठी काय वाढून ठेवले आहे, हे पाहणे गरजेचे आहे. जेव्हा मला वाटेल मी लोकांसाठी काम करू शकतो, जेव्हा माझे अंतर्मन मला तसा कौल देईल, त्यावेळी मी राजकारणात येण्याचा विचार करेन, असे वडेरा यांनी सांगितले.