आपल्या भूकंपग्रस्तांना जुने कपडे अथवा शिल्लक अन्न पाठवू नये, अशी नम्र विनंती नेपाळने भारताला केली आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी या मुद्दय़ास दुजोरा दिला आहे.
नेपाळला गेल्या आठवडय़ात भूकंपाचा तडाखा बसल्यानंतर भारताने तातडीने त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू केला होता. या भूकंपामुळे संकटात सापडलेल्या सुमारे ९० लाख लोकांच्या मदतीसाठी सरकारबरोबरच विविध सेवाभावी संस्था, उद्योगविश्वानेही मदतीचा हात नेपाळच्या पुढे केला.
गेल्या आठवडय़ात बिहारच्या रक्सौल भागातून एक रेल्वेगाडी नेपाळमध्ये आल्यानंतर जुन्या कपडय़ांसंबंधीची बाब अधिकाऱ्यांच्या ध्यानी आली. त्यामध्ये जुन्या कपडय़ांबरोबरच अन्यही अस्वीकारार्ह वस्तू होत्या. याखेरीज शिळेपाके अन्नही होते. त्याची दखल घेऊन असे काही आपल्याला पाठविले जाऊ नये, असे नेपाळच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.
दरम्यान, देशभरातील विविध राज्ये व अन्य ठिकाणांहून आलेल्या मदतीची दिल्ली येथे गृह मंत्रालयामार्फत छाननी करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नेपाळला देण्यात येणाऱ्या मदतीची आम्ही तपासणी करीत असून त्यानुसार ४ मे रोजी पाठविण्यात आलेल्या वस्तूंमध्ये नव्या कोऱ्या टॉवेलचा समावेश होता आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांनीही त्यांचा आनंदाने स्वीकार केला, असे राघवेंद्र या अधिकाऱ्याने सांगितले.