पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना भारताच्या विरोधात वक्तव्ये करणे थांबवा, असे आदेश दिले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी खबरदारी म्हणून शरीफ यांनी असा पवित्रा घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भूतकाळात काय झाले हे पुन्हा उकरून काढण्यापेक्षा बऱ्याच काळानंतर पुन्हा मार्गी लागलेल्या भारत-पाक चर्चेला पोषक अशीच विधाने करावीत, असे नवाज शरीफ यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सांगितले आहे. भारत आणि पाक या दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या या संवादप्रक्रियेकडे नवाज शरीफ हे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी भारताकडून सातत्याने पाकव्याप्त काश्मिरच्या मुद्यावर चर्चा करण्याच्या विधानांमुळे नवाज शरीफ त्रस्त झाले होते. मात्र, ही केंद्र सरकारची अधिकृत भूमिका नसल्याची गोष्ट आता त्यांच्या ध्यानात आली आहे. त्यामुळे आगामी काळात काश्मीर, दहशतवाद आणि व्यापार या मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्यासाठी नवाज शरीफ उत्सुक असल्याचे समजते. विशेष म्हणजे याबाबतीत शरीफ आणि पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी पॅरिस येथे नरेंद्र मोदी आणि शरीफ यांची भेट झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी बँकॉकमध्ये एकमेकांची भेट घेतली होती. त्यामुळे भारत-पाक संवादप्रक्रियेत सुधारणा होण्यास मोठी मदत झाली होती. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानशी युद्ध हा पर्याय नसल्याचे सांगत शांतता प्रक्रियेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले होते. याशिवाय, पुढील महिन्यात स्विर्त्झंलड येथे दाव्होस परिषदेच्यानिमित्ताने मोदी आणि शरीफ एकमेकांना भेटणार आहेत.