केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची सारवासारव केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री महेश शर्मा वक्तव्याने पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. परदेशी पर्यटकांनी भारतात स्कर्ट परिधान करणे टाळावे, असा सल्ला दिला होता. मात्र जे पर्यटक धार्मिक स्थळी जातात त्यांच्यासाठी ही सूचना होती अशी सारवासारव शर्मा यांना करावी लागली. रविवारी आग्रा येथे बोलताना महिलांनी त्यांच्या सुरक्षेसाठी, परदेशातील महिला पर्यटकांनी आखूड कपडे किंवा स्कर्ट परिधान करू नये, असे सुचवले होते. भारतीय संस्कृती भिन्न आहे हे लक्षात ठेवावे, अशी आठवण त्यांनी करून दिली होती. शर्मा यांच्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. हे मंत्र्यांचे असांस्कृतिक वक्तव्य आहे, अशी टीका काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केली होती. मोदींपेक्षा वैदिक काळात महिलांना वेशभूषेचे स्वातंत्र्य होते, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. अशा वक्तव्यातून शर्मा यांची मानसिकता दिसून येते, असा टोला दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी लगावला. वाढती टीका पाहून शर्मा यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले. आपल्याकडे विविधता आहे. प्रत्येक १०० किलोमीटरवर खाणे तसेच वेशभूषा बदलते. त्यामुळे अशी बंदी घालणे हे आमच्या कल्पनेत नाही. धार्मिक स्थळी जाताना काय परिधान करावे यासाठी सल्ला दिला, असे स्पष्टीकरण शर्मा यांनी दिले. मला दोन मुली आहेत. कोणी काय परिधान करावे याबाबत मी काही बोललो नाही, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.