भारत आणि चीनमध्ये सिक्किम सीमेवरील डोक्लाम भागात महिन्याभरापासून जोरदार तणातणी सुरु आहे. भारत आणि चीनमधील तणाव वाढला असताना भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे. त्यामुळे आता चीनचा आणखी जळफळाट होण्याची शक्यता आहे. चीन आणि व्हिएतनाममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. त्यातच आता भारताने व्हिएतनामला मदत केल्याने चीन आणखी आक्रमक होऊ शकतो. मात्र भारताकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. व्हिएतनामसोबत असा काही व्यवहार झाला का, यावर भारताकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. एनडीटीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

ब्राह्मोस क्षेपणास्त्र जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. व्हिएतनामकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र चीनच्या विरोधात समुद्री सीमेवर तैनात केले जाऊ शकते. चीन आणि व्हिएतनाममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. दक्षिणी चिनी समुद्रात हे दोन देश वारंवार एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळेच व्हिएतनामकडून भारताला करण्यात आलेल्या मदतीमुळे चीन अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच व्हिएतनामने याबद्दलची माहिती दिली असली, तरी भारताकडून यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

व्हिएतनामला नेमकी किती क्षेपणास्त्रे देण्यात आली, यासाठी किती रकमेचा करार झाला, याबद्दलचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. चीनच्या विरोधात भारताने नेहमीच व्हिएतनामला सहाय्य केले आहे. याशिवाय व्हिएतनामला आकाश क्षेपणास्त्र देण्याबद्दलही विचार सुरु आहे. सोबतच सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानांचे प्रशिक्षणही व्हिएतनामच्या सैन्याला भारताकडून दिले जाणार आहे.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना एका प्रश्नाला उत्तर देताना व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ले थी गुरु हांग यांनी व्हिएतनामकडून खरेदी करण्यात आलेली सुरक्षा उपकरणे देशाच्या संरक्षणासाठी असल्याचे म्हटले. ‘भारत आणि व्हिएतनाम सामरिक रणनितीवर काम करत असून शांतता, स्थिरता, विकासासाठी दोन्ही देश एकमेकांना सहकार्य आहेत,’ असे त्यांनी म्हटले. दोन्ही देश संरक्षण क्षेत्रातही एकमेकांसोबत काम करत असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.