डॉल्फिन माशांनाही बोलीभाषा असते असा दावा संशोधकांनी केला आहे. दोन डॉल्फिनमधील संभाषण वैज्ञानिकांनी ध्वनिमुद्रित केले आहे. काळ्या समुद्रातील दोन बॉटल नोज डॉल्फिन्समधील हे संभाषण असून त्या माशांची नावे यशा व याना अशी आहेत. त्यांचे संभाषण ध्वनिमुद्रित करताना वैज्ञानिकांनी ते विचलित होणार नाहीत याची काळजी घेतली. काही स्पंदनांच्या मदतीने ते शब्द व वाक्ये तयार करतात असे व्याचेस्लाव रायबोव यांनी म्हटले आहे. दोन व्यक्तींमध्ये जसे संभाषण होते तसेच या दोन माशांमध्ये झाले असे त्यांनी सीएनएनला सांगितले. ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठाचे जोशुआ स्मिथ यांनी सांगितले की, डॉल्फिनमध्ये संभाषण होते हे सिद्ध करण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. सध्या तरी असा ठाम निष्कर्ष काढता येणार नाही. माशांचे संदेश हे माणसांसारखेच संदर्भ असलेले असतात. डॉल्फिन त्यासाठी दोन प्रकारांच्या आवाजांचा वापर करीत असतात. व्हिसल व क्लिक अशी दोन प्रकारची स्पंदने त्यात असतात. रायबोव यांनी काही स्पंदने वेगळी काढली व त्यातून माशांनाही स्पंदनांची भाषा असते त्यातून ते वाक्ये व शब्द तयार करतात असे म्हटले आहे. यात मानवी बोली भाषेतील सर्व वैशिष्टय़े दिसून येतात. याचा अर्थ डॉल्फिन्सची बुद्धिमत्ता खूप जास्त असते असे सेंट पीटर्सबर्ग पॉलिटेक्निकल युनिव्हर्सिटी जर्नल-फिजिक्स अँड मॅथेमेटिक्स या नियतकालिकात म्हटले आहे. त्यांची भाषा जास्त प्रगत आहे असे सांगून रायबोव म्हणतात की, यातून माणूस असे उपकरण तयार करू शकतो ज्याच्या मदतीने डॉल्फिनशी संवाद साधता येईल. माणसांनी प्रथम पृथ्वीवरील पहिल्या बुद्धिमान प्राण्यांशी संपर्क केला पाहिजे तो डॉल्फिन व माणसाच्या संपर्कातून शक्य आहे. स्मिथ यांच्या मते डॉल्फिनचे संदेशवहन किंवा संवाद हा नवीन विषय आहे व त्यात आणखी संशोधनाची गरज आहे.