निम्म्याहून अधिक अमेरिकी मतदारांचे मत

अमेरिकेच्या अध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर? केवळ या विचारानेच जगभरातील अनेकांना धडकी भरत आहे. विशेष म्हणजे निम्म्याहून अधिक अमेरिकेची भावनाही याहून वेगळी नाही. केवळ एकतृतीयांश अमेरिकी नागरिकांना ते व्हाइट हाऊसमध्ये बसण्यास काहीसे लायक आहेत असे वाटते.

असोसिएटेड प्रेस ही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आणि जीएफके ही संस्था यांनी केलेल्या सर्वेक्षणातून या बाबी उघड झाल्या. ट्रम्प यांची संपूर्ण प्रचारमोहीम अमेरिकेतील स्थलांतरितांच्या मुद्दय़ाभोवती फिरत असून, या प्रश्नावर त्यांची भूमिका अत्यंत कडवी आहे. मात्र या सर्वेक्षणानुसार, बहुतांश मतदारांचा त्यांच्या या भूमिकेस विरोध आहे. ट्रम्प हे सातत्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ांवर बोलत असतात. मात्र त्याबाबतही मतदारांचा त्यांच्यावर विश्वास दिसत नसून, देशासमोरील विविध समस्या हिलरी क्लिंटन अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात असे मतदारांना वाटत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच येत्या ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाले तर त्यामुळे हर्षभरीत होणाऱ्या अधिकृत मतदारांची संख्या केवळ २९ टक्के आहे. या घटनेमुळे आमचा ऊर अभिमानाने भरून येईल असे सांगणाऱ्या मतदारांची संख्या केवळ २४ टक्के एवढी आहे.

ट्रम्प यांच्या प्रतिमेबद्दल मतदारांचे मोठे आक्षेप आहेत. देशातील चारपैकी केवळ एका मतदारास ट्रम्प हे सभ्य वा दयाळू वाटतात, तर एक तृतीयांश मतदारांना ते वंशवादी नाहीत असे वाटते.

असे असले, तरी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनाही ही निवडणूक सोपी नाही. केवळ ३९ टक्के मतदारांचे त्यांच्याबद्दल चांगले मत आहे. ५६ टक्के मतदारांना त्या नापसंत आहेत. त्या निवडून आल्या तर आम्ही आनंदाने नाचू वा आम्हांस अभिमान वाटेल असे सांगणारांचे प्रमाण एक तृतीयांशाहूनही कमी आहे.

दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने अमेरिकी मतदार हिलरी क्लिंटन यांच्याकडे पाहात असल्याचे असोसिएटेड प्रेस-जीएफकेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. क्लिंटन निवडून येणे ही भयकारी गोष्ट असल्याचे ४१ टक्के मतदारांचे मत आहे. ट्रम्प यांच्याबाबतीत मात्र हाच आकडा ६१ टक्के एवढा आहे.