शरीफ यांच्याशी चर्चेवर स्पष्टीकरण

जगातील अनेक प्रश्न सामोपचाराच्या माध्यमातून नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मिटवू शकतील व त्यामुळे तणावही कमी होईल, अशा आशावाद अमेरिकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तानला त्यांचे प्रश्न सोडवण्यास आपण मदत करू असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले होते, त्या पाश्र्वभूमीवर पेन्स यांनी हे वक्तव्य केले आहे.

पेन्स यांनी सांगितले, की भारत व पाकिस्तान यांच्यात सध्या खूप तणाव आहे व त्यामुळे काश्मीरमध्ये हिंसाचार मोठय़ा प्रमाणात चालू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करताना ट्रम्प यांनी जे वक्तव्य केले आहे त्यातून अमेरिकेचे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याचे प्रयत्नच दिसून येतात. काश्मीर प्रश्नात ट्रम्प मध्यस्थी करू शकतील काय, असे विचारले असता पेन्स यांनी सांगितले, की अमेरिकेतील रोजगाराचा प्रश्न सोडवणे व अमेरिकी लोकांचे हित जपणे याला त्यांचे प्राधान्य राहील हे खरे असले तरी जगाच्या कारभारात ते महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. समझोता घडवून आणण्याचे त्यांचे कौशल्य मोठे आहे, ते जगातील तणाव कमी करताना अनेक प्रश्न सोडवू शकतील. दक्षिण आशियात अमेरिका पुरेपूर लक्ष घालील व भारत-पाकिस्तान या दोन देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करील, असे ट्रम्प यांनी शरीफ यांच्याशी केलेल्या संभाषणावरून दिसून येत आहे असे ते म्हणाले.